पवना सुधार, पाणी प्रकल्पांना गती

By admin | Published: January 1, 2017 04:37 AM2017-01-01T04:37:47+5:302017-01-01T04:37:47+5:30

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणार असल्याचे संकेत राज्य शासनाने दिले असून, स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड

Pawan reform, speed up water projects | पवना सुधार, पाणी प्रकल्पांना गती

पवना सुधार, पाणी प्रकल्पांना गती

Next

पिंपरी : केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणार असल्याचे संकेत राज्य शासनाने दिले असून, स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी, मेट्रो, पवना सुधार, पाणी पुरवठ्याचे प्रलंबित प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजना जाहीर केली होती. पहिल्या टप्प्यात झालेल्या सर्वेक्षणात, स्पर्धेत पुण्याबरोबर पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला होता. या स्पर्धेत ९२.५ गुण या स्पर्धेत मिळाले होते. मात्र, अंतिम यादीत राजकारण झाल्याने गुणवत्ता असतानाही पिंपरी-चिंचवडचा पत्ता कट झाला होता. त्या वेळी विद्यमान खासदार, आमदार, महापौर यांनी याबाबत जोरदार आवाज उठविला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेसना, भाजपा, काँग्रेस, मनसे अशा विविध पक्षांच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले होते. महापालिका सभेमध्येही स्मार्ट सिटीत डावलल्याचे पडसाद उमटले होते. काही काळ सत्ताधारी भाजपाने यावर चुप्पी साधली होती. विविध राजकीय पक्षांनीही केंद्राच्या निर्णयाचा निषेध केला होता.
त्यानंतर खासदार, आमदार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. कोणते शहर बाहेर पडले, तर पिंपरी-चिंचवडचा विचार करू, असे नगरविकास मंत्र्यांनी सूचित केले होते. त्या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्मार्ट सिटीत समावेश झाला नाही, तरी राज्याकडून पिंपरीच्या विकासासाठी वेगळे पॅकेज देऊ, अशीही घोषणा केली होती.
एकजुटीच्या मागणीस यश
स्मार्ट सिटी समावेशाबाबत विविध पक्षांनी एकजुटीने मागणी केली होती. त्यामुळे त्यास यश आले आहे. त्यानंतर सुमारे वर्षभराने पुण्यात झालेल्या मेट्रोच्या कार्यक्रमात नगरविकासमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडचा समावेश स्मार्ट सिटीत करणार असल्याचे सूचित केले. तत्त्वत: मान्यता दिली होती. महापालिकेची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्र्यासमवेत बैठक झाली. त्या वेळी याबाबतचा प्रस्ताव तयार करून केंद्रास सादर करण्याचे ठरले आहे.
प्रकल्प लागणार मार्गी
महापालिकेच्या वतीने यापूर्वी जेएनएनयूआरएम अंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात आले. त्यापैकी काही प्रकल्प अपूर्ण आहेत. चोवीस तास पाणी, पवना जलवाहिनी, भामा आसखेड जलवाहिनी, मेट्रो, रिंग रोड, ट्राम, पवना सुधार योजना, जलनिस्सारण प्रकल्प असे प्रलंबित राहिलले आहेत. त्यास चालना मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांचे ट्वीट
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवडलेल्या यादीतून पिंपरी-चिंचवडला डावलल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना होती. त्याचा महापालिका निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता होती. राष्ट्रवादीने भाजपाविरुद्ध रान उठविले होते. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतल्याचे नेत्यांनी सांगितले. ‘ केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अखेर पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान व केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट केले असले, तरी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाइटवर पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश दिसत नाही.

नागरी सुविधा होणार स्मार्ट
पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होणे, ही आनंददायी बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात स्मार्ट सुविधा देणे हे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. या संदर्भातील डीपीआर तयार केला होता. मात्र, पुण्याबरोबरीने आपला प्रस्ताव असल्याने निवड झाली नाही. आता शासनाने पिंपरी-चिंचवडचा विचार केला आहे. त्यामुळे पाच वर्षांसाठी अठराशे कोटी रुपये मिळणार असून, त्यामुळे पथदिवे, पर्यावरण संवर्धन, स्मार्ट सिग्नल यंत्रणा, पाणीपुरवठा आणि नदीसुधार प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी हे प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरी सुविधा स्मार्ट होण्यास मदत होणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.

Web Title: Pawan reform, speed up water projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.