पवनाकाठी दिवसासोबत रात्रीही खेळ चाले! अनधिकृत टेन्टसाठी आठ लाखांच्या ‘वसुली’ची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:54 AM2023-11-24T10:54:14+5:302023-11-24T10:54:54+5:30
अनधिकृत टेन्टचा व्यवसाय म्हणजे गैरप्रकारांची साखळी असून त्यामुळे या परिसरात ‘दिवसासोबत रात्रीही खेळ चाले’ अशी परिस्थिती आहे....
पिंपरी : पवना धरण परिसरात धनदांडग्यांनी दोनशेवर अनधिकृत टेन्ट उभारले आहेत. या गोरखधंद्यातून कोट्यवधींची उलाढाल होत असून, पोलिसांकडून दरमहा आठ लाखांची ‘वसुली’ केली जात असल्याची चर्चा आहे. अनधिकृत टेन्टचा व्यवसाय म्हणजे गैरप्रकारांची साखळी असून त्यामुळे या परिसरात ‘दिवसासोबत रात्रीही खेळ चाले’ अशी परिस्थिती आहे.
मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात अनधिकृत टेन्ट कॅम्प आहेत. यात काही बड्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडून प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून टेन्टचा गोरखधंदा सुरू आहे. यात दिवसा अल्पवयीन प्रेमीयुगुलांचा खेळ चालतो, तर पर्यटनाच्या, मौजमजेच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत दारू, नाचगाण्याच्या पार्ट्या सुरू ठेवत परिसरातील शांततेस तडा दिला जात आहे. सर्वच नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. धरण परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
एका टेन्टमागे चार हजार रुपये?
एका टेन्टमध्ये दोन ते तीन जण मुक्काम करू शकतात. एका रात्रीसाठी प्रत्येकी दीड हजार रुपये सरासरी भाडे आकारले जाते. ‘वीकेंड’ला मोठी गर्दी होते. शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारसाठी सर्व टेन्टची नोंदणी झालेली असते. वय, रहिवासी पुरावा न दाखवता, नोंदी न करता मुक्कामासाठी टेन्ट पुरवला जातो. तेथे दारूचीही सोय होते. अल्पवयीन प्रेमीयुगुलांची गर्दी दिसते. सगळाच मामला अनधिकृत असल्याने एका टेन्टमागे पोलिसांना दरमहा चार हजार रुपये द्यावे लागतात, असे दबक्या आवाजात बोलले जाते.
वसुलीवाल्याचा धुमाकूळ
खास वसुली करणाऱ्या पोलिसाचा आणि त्याच्या पंटरचा परिसरात धुमाकूळ सुरू आहे. ‘मेसेज’ची देवाणघेवाण करण्यासाठी व्हॉटसॲप ग्रूप बनवला असून, हा पोलिस त्यावर ‘मेसेज’ देतो. टेन्टवाल्यांसह गुटखा, दारूपुरवठा करणाऱ्यांकडूनही वेगळी वसुली केली जाते.
हाॅटेल, रेव्ह पार्टीसाठीही ‘रेट’ ठरलेले
परिसरातील काही हाॅटेलवालेही दरमहा पोलिसांना ‘खूश’ करतात. रेव्ह पार्टीसाठीही त्या ठिकाणानुसार वेगळा आकार पडतो. त्यासाठी वसुली पंटर परिसरात सातत्याने घिरट्या घालत असतो.
३१ डिसेंबरसाठी ‘रेटकार्ड’ तयार!
पुणे, हिंजवडी, पिंपरी-चिंचवडकर तसेच मुंबईकरही नववर्ष स्वागतासाठी पवना धरण परिसराला पसंती देतात. त्यामुळे टेन्टला मोठी मागणी असते. पोलिसांनी ३१ डिसेंबरला एका टेन्टसाठी २५ हजार, तर हाॅटेलसाठी ३५ हजार असे ‘रेटकार्ड’ तयार केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
गस्तीवरील पोलिसांचा कानाडोळा
अनधिकृत टेन्ट परिसरात सुरू असलेल्या गुटखा, दारू, सिगरेट आणि गांजा विक्रीकडे गस्तीवरील पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. हुक्काही सर्रास पुरवला जातो. त्यावर काहीच कारवाई होत नाही. अनधिकृत टेन्टवाल्यांचा धंदा बिनबोभाट सुरू आहे.
अनेकांचा खिसा गरम
अनधिकृत टेन्ट व्यवसायात गैरप्रकारांची साखळी कार्यरत आहे. यात पोलिस व प्रशासनातील अनेकांचा खिसा गरम केला जातो. त्यामुळे दिवसा उजेडी आणि रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या गैरप्रकारांना अभय मिळत आहे. हे अभय मिळवून देणारा कोण, याचा शोध अजून लागलेला नाही.