पवारांनी पुरंदरच्या जनतेला फसविले- विजय शिवतारे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:02 AM2019-01-21T02:02:23+5:302019-01-21T02:02:40+5:30
गेली पन्नास वर्षे पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेने पवारांवरती प्रेम केले. मात्र त्यांनी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली.
भुलेश्वर : गेली पन्नास वर्षे पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेने पवारांवरती प्रेम केले. मात्र त्यांनी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली. पुरंदरसाठी कोणत्याही प्रकारचे ठोस काम करता आले नाही. पंधरा वर्षांत गुंजवणी धरणाला वीट लावता आली नाही. गेल्या पन्नास वर्षांत पवारांनी पुरंदरच्या जनतेला फसवले असल्याची टीका राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी केली.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील वाघापूर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन शिवतारे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.
शिवतारे म्हणाले, की राज्यामध्ये पुरंदर तालुका सर्वाधिक पुढे असेल. या ठिकाणी नियोजित विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. फक्त राजकीय विरोध राहिला आहे. पुरंदरच्या रस्त्यांची कामेसुद्धा आता जोमात सुरु आहेत असल्याने आता बारामतीकडे झुकण्याची गरज नसल्याचे टोला त्यांनी लगावला.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव, माजी सभापती अतुल म्हस्के ,पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, रमेश इंगळे, युवा सेना अध्यक्ष मंदार गिरमे,उमेश गायकवाड, गणेश मुळीक, वाघापुरच्या सरपंच छाया वाघमारे, उपसरपंच सारिका कुंजीर, नरेश कुंजीर, मनोज कुंजीर, प्रविण कुंजीर, बाळासो इंदलकर, नितिन कुंजीर परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
>गुंजवणी धरणाल तेराशे कोटींची मान्यता
तालुक्याला वरदान ठरणाऱ्या गुंजवणी धरणाचे काम प्रगतिपथावर आहे. तेराशे तेरा कोटींची मान्यता मिळाली आहे. पन्नास कोटींचा निधीही आहे. फेब्रुवारीच्या अधिवेशनात पुढील निधी येईल. यामुळे गुंजवणीला निधी कमी पडणार नाही. यामुळे पुढील पंधरा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू केले जाईल.