पवारांना घाबरलो नाही, ‘हे’ किस झाड की पत्ती
By admin | Published: June 2, 2017 02:18 AM2017-06-02T02:18:09+5:302017-06-02T02:18:09+5:30
माझ्याविरुद्ध लढणारांची मी कधीच चिंता करत नाही. मी शरद पवारांना घाबरलो नाही, तर बाकीच्यांचे काय? माझ्याविरुद्ध अपप्रचार
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : माझ्याविरुद्ध लढणारांची मी कधीच चिंता करत नाही. मी शरद पवारांना घाबरलो नाही, तर बाकीच्यांचे काय? माझ्याविरुद्ध अपप्रचार करणारे किस झाड की पत्ती, अशी खरमरीत टीका खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आमदार महेश लांडगे यांचे थेट नाव न घेता केली.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची अफवा पसरवणे हे बालिशपणाचे लक्षण आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिका सर्वसामान्यांच्या रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत प्रश्नांसाठी खर्च करण्यासाठी दहा वेळा विचार करते आणि दारूची दुकाने चालू करण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी महामार्ग ताब्यात घेऊन त्यावर एक हजार कोटी खर्च करण्यास तयार आहे, अशी महापालिकेच्या कारभारावरही त्यांनी भोसरीतील पत्रकार परिषदेत बोलताना टीका केली.
भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे कामही तीर्थक्षेत्र विकास निधीतून होऊ शकत होते त्यासाठी भरमसाठ खर्च महापालिका करत असून सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा देण्यास कमी पडत आहे. त्यामुळे या कामांवर नियंत्रण असणे व चुकीच्या कामांची गंभीर दाखल घेणे गरजेचे आहे, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.
शिवसेनेच्या नेत्यांचे भाजपाकडून खच्चीकरण
भाजपचे राज्य सरकार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गळचेपीची भूमिका घेत असल्याचे दिसून येते. भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्यांचीही कामे सरकार करते, शिवाय राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांची कामे सहजपणे होतात, पण शिवसेना सत्तेत असूनही आमची कामे राज्य सरकार करत नाही. हे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे सरकारी धोरण आहे, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली.