पवार म्हणाले ‘त्यांच्या पोटात नक्की दुखले असेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:28+5:302021-01-02T04:10:28+5:30
पुणे : भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पुण्याच्या १४ लाख लोकांना पाणी मिळणार आहे. पण यामुळे काही लोकांच्या पोटात नक्की ...
पुणे : भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पुण्याच्या १४ लाख लोकांना पाणी मिळणार आहे. पण यामुळे काही लोकांच्या पोटात नक्की दुखले असेल, असा चिमटा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढला.
भामा आसखेड प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर ते शुक्रवारी (दि. १) बोलत होते. पवार म्हणाले, की हा प्रकल्प पूर्ण करण्याची अवदसा कुठून आठवली आणि निघाले हे पाणी द्यायला यांना असेच टँकरमाफियांना वाटत असेल.
पूर्व पुण्यातल्या वडगाव शेरी, खराडी, चंदननगर, धानोरी, कळस आदी भागातल्या सततच्या पाणी टंचाईमुळे येथील लोक त्रस्त होते. जुन्या बारामती लोकसभा मतदारसंघात पुण्याचा हा काही भाग येत असे. त्यावेळी मत मागायला गेल्यानंतर लोक म्हणत, ‘मत देतो पण पाणी द्या.’ या भागात टँकर माफियांचे राज्य चालायचे, ते कशारितीने पाणी द्यायचे हे मला माहिती आहे. या योजनेमुळे येथील नागरिकांची स्वप्नपुर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.
चौकट
चंद्रकांतदादांची सूचना मान्य
“भामा आसखेडचे पाणी पुण्यात आल्याने खडकवासला धरण साखळीतून होणारा पाणीपुरवठा कमी होण्याची भीती पुणेकरांना वाटते. हा पुरवठा कमी करु नये अशी विनंती मी अजित पवार यांना करतो,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पुण्याचे पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी याचे नियोजन करण्यासाठी सर्व यंत्रणांची बैठक घ्यावी, असेही पाटील यांनी सुचवले. अजित पवार यांनी ही सूचना मान्य केली. ग्राम पंचायत निवडणुकीनंतर सर्व संबंधितांची बैठक घेऊन पुण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
चौकट
पुण्याचा वाढता पाणीवापर
अजित पवार म्हणाले की १९९१ मध्ये पुण्याला पाच टीएमसी पाणी लागत असे. आता ही गरज साडे सतरा-अठरा टीएमसीवर गेली आहे. पुण्यात दरडोई दैनंदिन पाणीपुरवठा सव्वातीनशे लिटर होतो. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया योग्य झाल्यास या पाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी करता येईल. पाण्याची उपलब्धता नसलेल्या शहरांचा विकास खुंटतो. या पार्श्वभूमीवर “पुण्याच्या पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी नियोजन केले जाईल पण पुण्याला पाणी कमी पडू दिले जाणार नाही,” असे पवार यांनी स्पष्ट केले.