३० लाख खंडणी दे, नाहीतर मारुन टाकतो! भंगार व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 07:04 PM2023-09-12T19:04:13+5:302023-09-12T19:05:24+5:30
पाच दिवस आधीच केली रेकी...
पिंपरी/सासवड : भंगार व्यवसायकीच्या १४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून फोन करत ‘‘३० लाख रुपयाची खंडणी दे नाही तर तुमच्या मुलाचे हात-पाय तोडून त्यास मारुन टाकतो.” अशी धमकी दिली. मात्र, अवघ्या अडीच तासात गुन्हे शाख युनिट चारच्या पथकाने अपहरण करणाऱ्यांना अटक करत मुलाची सुटका केली. अटक केलेल्या संशयितांची नावे तेजस ज्ञानोबा लोखंडे ( वय २१ ), अर्जुन सुरेश राठोड (१९, दोघे रा. दत्त मंदिर शेजारी, मारुंजीगाव) विकास संजय मस्के (२२ रा. शिवार वस्ती, भुमकर चौक) अशी आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) करण्यात आली. हॉटेल व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने मुलाचे अपहरण केल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे कारमधून तीन जणांनी अपहरण सकाळी सातला केल्याची माहिती पोलिस हवालदार मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली. हा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी याबाबत आपल्या वरिष्ठांना सुचित केले. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-४ चे सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी मुलाचे अपहरण केले ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात तीन व्यक्ती हे एका निळया रंगाचे झेन गाडीमध्ये अपहरण केलेल्या मुलास घेऊन जात असल्याचे दिसत होते. पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाच्या काकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून माहिती काढण्यास सांगितले. त्याच दरम्यान मुलाच्या काकास वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन अपहरणकर्त्याने “३० लाख रुपयाची खंडणी दे नाही तर तुमच्या मुलाचे हात-पाय तोडून त्यास मारुन टाकतो" अशी धमकी दिली.
पोलिसांनी त्या फोनचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी ताथवडे येथून सासवडच्या दिशेने जात असल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासवड पोलिसांना याबाबत माहिती दिली. सासवड पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी लावली. त्या नाकाबंदीमध्ये सासवड पोलिसांना तीनजण संशयितरित्या एका कारमधून जात असताना दिसले. सासवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अपहरण झालेल्या १४ वर्षीय मुलाची सुटका केली.
पाच दिवस आधीच केली रेकी-
पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यातून पोलिसांनी तीन मोबाईल फोन, एक छऱ्याचे पिस्टल, कोयता, सुरा, छन्नी, हातोडा असा ऐवज आढळून आला. आरोपींनी पाच दिवस परिसराची रेकी केली. त्यानंतर मुलाचे अपहरण केले. आरोपींना हॉटेल व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांना पैशांची कमतरता होती. म्हणून त्यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.