सव्वा लाखाची खंडणी दे, नाही तर माल उतरवू देणार नाही; माथाडी संघटनेच्या नावाखाली मागितली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 12:30 PM2023-09-03T12:30:12+5:302023-09-03T12:30:36+5:30
खंडणी मागणाऱ्या तिघांना खंडणीविरोधी पथकाकडून अटक
पुणे : माथाडी संघटनेच्या नावाखाली दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये व्यावसायिकांकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. हडपसर आणि येरवडा भागांत या खंडणीच्या घटना घडल्या आहेत. सागर सुभाष वायकर (३६), शिवम मारुती कुंजीर (२२, रा. कुंजीरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत. या प्रकरणी एका व्यावसायिकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संबंधित फिर्यादीचा टेम्पो मांजरी परिसरात एका इमारतीजवळ फर्निचर साहित्य घेऊन आला होता. त्यावेळी आरोपी वायकर आणि कुंजीर यांनी टेम्पो अडवत, त्यातील फर्निचर साहित्य आमच्या संघटनेचे कामगार उतरवणार, अशी धमकी त्यांनी व्यावसायिकाला दिली. तसेच तक्रारदाराला धमकावत चार हजार ८०० रुपयांची खंडणी मागितली, खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकीदेखील दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दाभाडे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत येरवडा परिसरातील कल्याणीनगर येथे टेम्पो अडवत माथाडी संघटनेच्या नावाखील एक लाख २० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्याला अटक करण्यात आली. विकी नारायण औरंगे (३१, रा. गांधीनगर, येरवडा) असे अटकेत असलेल्या खंडणीखोराचे नाव आहे. या प्रकरणीदेखील एका व्यावसायिकाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदाराचा माल घेऊन एक टेम्पो कल्याणीनगर येथील एका कंपनीत आला होता. त्यावेळी औरंगेने टेम्पो अडवत, माथाडी संघटनेच्या नावाखाली एक लाख २० हजारांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर माल उतरवू देणार नाही, अशी धमकीदेखील दिली. तडजोडीअंती ८० हजार रुपये त्याने उकळले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर करीत आहेत.