पुणे महापालिकेचा अजब नियम; पैसे भरा आणि आरोग्य विभागात फक्त ४५ दिवसांची नोकरी मिळवा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:42 PM2020-05-20T13:42:31+5:302020-05-20T13:56:19+5:30

आधीच बेरोजगारी, त्यातून हाताशी पैसा नाही मग रक्कम आणणार कुठून...

Pay and get a 45 day job in the health department! rules of the pune corporation | पुणे महापालिकेचा अजब नियम; पैसे भरा आणि आरोग्य विभागात फक्त ४५ दिवसांची नोकरी मिळवा! 

पुणे महापालिकेचा अजब नियम; पैसे भरा आणि आरोग्य विभागात फक्त ४५ दिवसांची नोकरी मिळवा! 

Next
ठळक मुद्देअतिरिक्त मनुष्यबळ उभारणीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर भरती संदर्भात घोषणा

नम्रता फडणीस-
पुणे : 'आधी पैसे भरा आणि नोकरी मिळवा, ती देखील केवळ ४५ दिवसांसाठी' असा अजब नियम महापालिकेने आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी लावला आहे. कोविड विरुद्धच्या लढाईत अतिरिक्त मनुष्यबळ उभारणीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर भरती संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यामधील या एका जाचक अटीमुळे इच्छुक तरुण हवालदिल झाले आहेत. आधीच बेरोजगारी, त्यातून हाताशी पैसा नाही मग रक्कम आणणार कुठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
         पुण्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठया प्रमाणावर ताण आला आहे. कोरोनाशी अजून काही महिने तरी लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने आरोग्य विभागात अस्थायी पदांवर ४५ दिवसांसाठी करार पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या  संकेतस्थळावर भरतीसंबंधी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी ( आयुर्वेदिक) , आरोग्य निरीक्षक, निरीक्षक ( हिवताप), ज्युनिअर नर्स, परिचारिका, औषध निमार्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ई.सी जी तंत्रज्ञ, सहाय्यक दवाखाना, आया, परिचारक अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या पदांसाठी काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हे पद कराराद्वारे केवळ ४५ दिवसांसाठी भरले जाईल. मात्र निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रुजू होण्यापूर्वी एक महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल व त्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही, अशी जाचक अट टाकण्यात आली आहे. या पदांसाठी जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उद्या ( २० मे ) दुपारी ३ वाजेपर्यंत पदांसाठी अर्ज करता येईल. परंतु अनामत रक्कम भरण्याच्या जाचक अटीमुळे अनेक तरुणांना इच्छा असून देखील अर्ज करणे अवघड झाले आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. या काळात सरकारी भरतीची तात्पुरत्या स्वरूपात का होईना घोषणा झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र या जाचक अटीमुळे दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे झाले आहे. आपली पदासाठी निवड झाली तर पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न तरुणांना पडला आहे. त्यामुळे नियम शिथिल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
     दरम्यान, या जाहिराती शेवटी दोन आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र या जाचक अटीसंदर्भात त्यातील एका  अधिकाऱ्याला विचारले असता  हा धोरणाचा भाग असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या कोर्टात चेंडू टोलवला.
.......
मी पाच वर्षांपूर्वी आरोग्य निरीक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु सरकारी भरती होत नसल्याने मी खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे घरीच आहे. या काळात कोणतेही उत्पन्न नसल्याने मी पालिकेची जाहिरात पाहून नोकरीसाठी अर्ज केला. जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे एका महिन्याचे मानधन आधी द्यायचं आहे. ते कसे जमा करावे हाच माज्या समोरचा प्रश्न आहे.
               - एक त्रस्त तरुण
---------

Web Title: Pay and get a 45 day job in the health department! rules of the pune corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.