कमीत कमी ३ लाख द्या; पुण्यात एजंटांचा सुळसुळाट, अभियांत्रिकीच्या ॲडमिशनचे विदारक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 10:57 AM2022-09-22T10:57:33+5:302022-09-22T10:57:48+5:30

नामांकित संस्थेत प्रवेश देण्यासाठी होते लाखोंची मागणी

Pay at least 3 lakhs Aggressiveness of agents shocking picture of engineering admissions in pune | कमीत कमी ३ लाख द्या; पुण्यात एजंटांचा सुळसुळाट, अभियांत्रिकीच्या ॲडमिशनचे विदारक चित्र

कमीत कमी ३ लाख द्या; पुण्यात एजंटांचा सुळसुळाट, अभियांत्रिकीच्या ॲडमिशनचे विदारक चित्र

googlenewsNext

ज्ञानेश्वर भोंडे 

पुणे : सीईटी, नीट परीक्षेचे निकाल नुकतेच लागले आहेत. अनेक मुलांना अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले नाहीत; तरीही नामांकित संस्थेत प्रवेश हवाय, असा अट्टाहास मुले धरत आहेत. त्यामुळे पालकही मुलांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी मॅनेजमेंट काेट्यातून प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. हीच स्थिती हेरत काही ठग प्रवेशाचा जणू मेनू कार्डच घेऊन पालकांना गाठत असल्याचे विदारक चित्र पुण्यात अनुभवास येत आहे.

असा हाेताेय व्यवहार

पुण्याबाहेरील पालक : मुलाला मॅनेजमेंट काेट्यातून अभियांत्रिकीला ॲडमिशन हवे आहे, किती डाेनेशन लागेल?
एजंट : विद्यार्थ्यांच्या डिटेल्स द्या. डाेनेशन खूप लागेल; पण आम्ही कमीत कमी पैशांत करून देताे.
पालक : किती द्यावे लागेल? आणि काेणत्या संस्थेत प्रवेश मिळेल?
एजंट (संस्थेत सब रजिस्टार असल्याचे सांगत) : तुम्हाला शहरातील या नामांकित काॅलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कमीत कमी तीन लाख रुपये द्यावे लागतील. आणि हं... त्याची काेणतीही पावती मिळणार नाही. शिवाय ट्यूशन फी वेगळी भरावी लागेल.
पालक : ठीक आहे. या नामांकित संस्थेत प्रवेश हवाय कधी येऊ.
एजंट : आजच या. प्रवेश फुल्ल हाेत आहेत. उद्या दुपारपर्यंत ते क्लाेज हाेतील. तुम्हाला शक्य नसल्यास ओळखीच्या व्यक्तींकडे पैसे देऊन पाठवा. आम्ही प्रवेश ओक्के करू. तुम्हाला ऑनलाइन रिसीट मिळून जाईल.
दुसरा एजंट : इतरांशी खूप फी आहे. तुम्ही आपल्या ओळखीतून आलात म्हणून केवळ तीन लाख रुपये घेत आहाेत. तत्काळ पैसे मागवून घ्या. उद्याच मुलाला काॅलेज जाॅईन करायला सांगा.
नातेवाईक : पैसे घेऊन एक व्यक्ती भाेसरीवरून येत आहे. त्याला थाेडा वेळ लागेल. ताेपर्यंत तुम्ही आम्हाला क्लासरूम, हाॅस्टेल, आदी दाखवा.
एजंट : मुलगा आला की त्यालाच दाखवू सर्व. तुम्ही लवकर पैसे मागवून घ्या. वेळ संपत आली आहे. रक्कम तत्काळ जमा करावी लागेल. हवं तर त्यांना वारजेला वगैरे बाेलव. तिथून कलेक्ट करूयात. ते कठीण असेल तर मी चेकची फाेटाे काॅपी टाकताे. त्या खात्यात तत्काळ तीन लाख टाकायला सांगा. सहकाऱ्यांना उशीर हाेतय, असे म्हणून व्हाॅट्सॲपवर चेकचा फाेटाे पाठवला.
तिसरा एजंट : मुंबई येथून. दुसरा एजंट नातेवाइकाच्या हातात फाेन देताे. समाेरून. तुम्हाला प्रवेशाची पावती माेबाईलवर मिळाली आहे. प्रवेश निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने बाेललेली रक्कम द्या. तसेच खुशाली म्हणून दुसऱ्या एजंटाला दहा हजार रुपये द्या. यात काही गडबड वाटल्याने नातेवाइकाने त्याच्या मित्राला बाेलून घेतले. तसेच पालकाला अलर्ट केले. संस्थेत जाऊन पावतीची सत्यता तपासली.

महाविद्यालय व्यवस्थापन : तब्बल २६ हजार रुपये भरून प्रवेश घेतल्याची पावती बराेबर आहे. परंतु, येथे प्रवेश घेण्यासाठी ट्यूशन फी व्यतिरिक्त काेणतेही डाेनेशन घेतले जात नाही. थेट या आणि प्रवेश घ्या. त्यामुळे काेणत्याही मध्यस्तांना पैसे देऊ नका. बळी पडू नका, असे म्हणत आपली बाजू सावरली.
नातेवाईक - संबंधित एजंट तुमच्या संस्थेची पावती घेताे आणि पालकांना ती पाठवून विश्वास संपादन करताे, हे कसे शक्य आहे.

संस्था - प्रवेशासाठी अनेकदा पालक किंवा नातेवाईक येतात. ते शुल्क भरून प्रवेश निश्चित करू शकतात. त्यानुसार ही व्यक्ती केली असावी.

दुसरा एजंट - नातेवाइकाला फाेन करून मुलाच्या पालकांना तत्काळ तीन लाख रुपये खात्यात टाकायला सांगा. मी एका संस्थेत कामाला आहे. तेथे प्रवेश घेतलेल्या मुलाचे पैसे मी आपल्या नातेवाइकाचे प्रवेश निश्चित करण्यासाठी दिले आहेत. ही रक्कम तुमच्याकडून मिळताच माझ्या संस्थेत भरावी लागणार आहे. तत्काळ द्यायला सांगा.

हा सर्व प्रकार वेळीच लक्षात आल्याने पालकाची माेठी फसवणूक टळली; मात्र असाच प्रकार अनेक पालकांच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे. विशेष करून पुण्याबाहेरील पालक यात जास्त बळी पडण्याचा धाेका आहे. त्यांनी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पालकांची लूट, एजंट अन् संस्था मालामाल

शहरातील अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी अशा एजंटांच्या टाेळ्याच तयार झाल्या आहेत. या नामांकित संस्थेत प्रवेश हवाय तर दहा लाख... या संस्थेत प्रवेश हवाय तर सात लाख आणि या संस्थेत प्रवेश हवा असल्यास तीन लाख रुपये.. असा मेनू कार्डच तयार केला आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या आवारातच हे सर्व खुलेआम घडत आहे. यामध्ये पालकांची प्रचंड आर्थिक पिळवणूक हाेत असून, एजंटांचे खिसे भरले जात आहेत.

वेळीच खबरदारी घ्या

अभियांत्रिकीचे व्यवस्थापन काेट्याचे ॲडमिशन अजून सुरू झालेले नाहीत. मात्र, आपल्या पाल्याला पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन मिळावे. विशेष करून सीईटीमध्ये कमी मार्क पडलेल्या पाल्यांसाठी पालकांची धडपड सुरू आहे. पुण्याबाहेरील पालकांकडून चाैकशी करताना असे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे शैक्षणिक संस्था अशा एजंटांच्या विळख्यात सापडू नका, असे आवाहन करीत आहेत.

चांगल्या नाेकरीची भुरळ

अभियांत्रिकीसह वैद्यकीय, व्यवस्थापन शाखांच्या काेर्सेसना मागणी वाढली आहे. हे काेर्सेस केल्यानंतर विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये लाखाेंच्या घरांत पॅकेजेस मिळत आहेत. म्हणून मार्केटमध्ये डिमांड असणाऱ्या काेर्सेससाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा वाढलेली आहे. ते पालकांकडे हट्ट करीत आहेत. पालकही मुलाला हव्या त्या शाखेला ॲडमिशन मिळावे यासाठी एजंटांना मध्यस्ती करून ही रक्कम देत असल्याचे आढळून आले आहे.

एजंट नाॅट रिचेबल...

ॲडमिशन करून देण्यासाठी तीन लाख रुपये मागणाऱ्या मध्यस्ताला त्याची बाजू जाणून घेण्यासाठी दैनिक ‘लाेकमत’च्या प्रतिनिधीने फाेन केला असता त्याने प्रथम काॅल उचलला. लाेकमतमधून बाेलत असल्याचे सांगताच त्याने फाेन कट केला. पुन्हा फाेन केला असता फाेन न उचलता कट केला. अशा प्रकारे बाेलणे टाळले.

एजंटांनी पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याचे कळले तेव्हा धक्काच बसला

संबंधित एजंटांनी मला ॲडमिशन करून देताे, असे सांगून मॅनेजमेंट फी म्हणून तीन लाख रुपये मागितले. मी ग्रामीण भागातील पालक आहे. मुलांचे भविष्य घडावे म्हणून प्रयत्नशील हाेताे. फसवणुकीचा झालेला प्रकार निंदनीय आहे, तसेच ते एखाद्याचे आयुष्यच उद्ध्वस्त करणारे आहे. मी, मुलाचे करिअर घडवायचे म्हणून डाेनेशनसाठी उसनेपासने पैसे गाेळा केले हाेते. एजंटांनी पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याचे कळले तेव्हा धक्काच बसला. - पीडित पालक

पालकांनी थेट कार्यालयात येऊन ॲडमिशन करावे

आमच्याकडे एकजण आला व त्याने स्वत:च्या मुलाचे इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन केले व नातेवाइकाचे म्हणून मार्कशीट दाखवून २६ हजार रुपये भरून आणखी एक ॲडमिशन केेले. हे प्राेव्हिजनल ॲडमिशन आहे. त्याची रितसर पावतीही त्यांना दिली. नंतर कानावर आले की त्यांनी या ॲडमिशनसाठी दुसऱ्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत आमच्याकडे काेणतीही अधिकृत माहिती नाही. आमच्या विश्वकर्मा युनिव्हर्सिटीत मॅनेजमेंट काेटा प्रकार नाही, तसेच डाेनेशनही नाही. आम्ही थेट ॲडमिशन देताे व त्याची पावती देताे. पालकांनी थेट कार्यालयात येऊन ॲडमिशन करावे, असे पत्रकही आम्ही छापून कार्यालयात लावलेले आहे. - डाॅ. उमेश पटवर्धन, संचालक, ॲडमिशन विभाग, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी

तुमचीही फसवणूक हाेत नाही ना?

तुमचे पाल्य बारावी उत्तीर्ण झाले आहेत. नामांकित संस्थेत प्रवेश मिळावा, यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तर सावधान! तुमच्याबाबतही फसवणुकीचा प्रकार घडू शकतो. असे घडत असेल, तर ८०१०९५४१४६ या क्रमांकावर तुमच्या तक्रारी व्हाॅट्सॲप करा. dnyaneshwar.bhonde@gmail.com या मेल आयडीवरही अनुभव आणि अडचणी पाठवू शकता.

Web Title: Pay at least 3 lakhs Aggressiveness of agents shocking picture of engineering admissions in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.