एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग द्या
By admin | Published: January 12, 2017 01:56 AM2017-01-12T01:56:49+5:302017-01-12T01:56:49+5:30
राज्यातील ५६ महामंडळांपैकी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असे महामंडळ आहे. परंतु
भोर : राज्यातील ५६ महामंडळांपैकी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असे महामंडळ आहे. परंतु, याच महामंडळातील कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत नेहमीच अन्याय होत आला आहे. राज्य शासनाने त्यांच्यावरील हा अन्याय दूर होण्यासाठी वेतन करार करण्याऐवजी वेतन आयोग द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.
२० जानेवारी रोजी मुंबईत एसटी कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने भोर एसटी आगारात कामगार संघटनेचा मेळावा आयोजित केला होता, त्या वेळी शिंदे बोलत होते. या वेळी एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, सचिव दिलीप परब, दादासाो चव्हाण, बबलू वाल्मीकी, शरद खोपडे, धनंजय कांबळे, बाळासाो शिर्के, राजेंद्र भेलके, दिलीप वरे मनोज पाटणे व कर्मचारी उपस्थित होते. दिलीप सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी संदीप शिंदे म्हणाले, ‘‘एसटी कामगार संघटना ही राजकारणविरहित संघटना असल्याने ती संपविण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. परंतु, कामगारांच्या पाठिंब्यावर कामगारांच्या हिताचे प्रश्न घेऊन संघटना आजही खंबीरपणे उभी आहे. एसटी महामंडळातील १८२ (ब) कलमाचा सूडबुद्धीने वापर केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या नाहक त्रास होत असल्याने ते कलम रद्द करा.’’
या मेळाव्यात भोर एसटी आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी मोहन बांदल, हनिप शेख, दीपक शेक, अजित भिडे, नारायण गोगावले, अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)