शेतकऱ्यांना २६ हजार कोटींची भरपाई द्या; कृषी विभागाचा राज्य सरकारला प्रस्ताव

By नितीन चौधरी | Published: August 18, 2022 03:15 PM2022-08-18T15:15:26+5:302022-08-18T15:15:51+5:30

सर्वात कमी पाऊस सांगलीत...

Pay compensation of 26 thousand crores to farmers; Proposal of Agriculture Department to State Govt | शेतकऱ्यांना २६ हजार कोटींची भरपाई द्या; कृषी विभागाचा राज्य सरकारला प्रस्ताव

शेतकऱ्यांना २६ हजार कोटींची भरपाई द्या; कृषी विभागाचा राज्य सरकारला प्रस्ताव

Next

पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विदर्भात तसेच मराठवाड्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी झाली असून, राज्यात तब्बल १८ लाखांहून अधिक हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेल्यात जमा आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार जुलैतील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सुमारे २६०० कोटींची नुकसान भरपाई द्यावी, असा प्रस्ताव कृषी विभागाने दिला आहे.

नागपूर विभागात सर्वाधिक

राज्यात मान्सून जुलैत दमदार बरसल्यानंतर ऑगस्टमध्येही धुवाधार बरसला. याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. विदर्भातील नागपूर विभागात आजवरच्या सरासरीच्या १६१ टक्के पाऊस झाला आहे. जून ते १६ ऑगस्टची सरासरी ७२८.९ मिमी असून, येथे आतापर्यंत ११७७.६ मिमी पाऊस झाला आहे. तर अमरावती विभागातही अतिवृष्टी झाली असून, तेथे सरासरी ५०६.८ मिमी असून, प्रत्यक्षात ६६० मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १३० टक्के झाला आहे. औरंगाबाद विभागात १३५.७ तर नाशिक विभागात ११३.५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, कोकणात सरासरी इतका अर्थात १०४.६ टक्के, तर सर्वात कमी ९५.६ टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागाची सरासरी ६५३ मिमी असून, येथे प्रत्यक्षात ६२४.६ मिमी पाऊस झाला.

सर्वात कमी पाऊस सांगलीत

पुणे विभागात सांगली जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस अर्थात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर धुळ्यात ९३.२, रायगड ९७.९, तर रत्नागिरीत ९९.३ टक्के पाऊस झाला आहे.

सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना फटका

कृषी विभागाने जुलैत झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यानुसार २२ लाख ८८ हजार ८६० शेतकऱ्यांचे तब्बल १८ लाख २१ हजार ४०३ हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. पूर्वीच्या एनडीआरएफच्या निकषांनुसार सुमारे १२९६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने मंगळवारी बदललेल्या निकषांनुसार ही रक्कम आता दुप्पट अर्थात २६०० कोटी रुपये झाली आहे.

ही भरपाई जुलैमध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ८० हजार हेक्टर नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यात आणखी वाढ होईल. मात्र, खरिपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हातातील हंगाम वाया गेला आहे. त्यांना आता रब्बी हंगामावरच अवलंबून राहावे लागेल.

- विकास पाटील, कृषी संचालक, पुणे

Web Title: Pay compensation of 26 thousand crores to farmers; Proposal of Agriculture Department to State Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.