वीज बिल नंतर भरा, फीडरचीही झाली दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:05+5:302021-09-23T04:12:05+5:30
लोणीकंद : शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा प्रश्नावर हवेली तालुका भाजपाने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे वीज कंपनीने बंद पडलेले फीडर तातडीने चालू केले ...
लोणीकंद : शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा प्रश्नावर हवेली तालुका भाजपाने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे वीज कंपनीने बंद पडलेले फीडर तातडीने चालू केले आणि थकीत वीज बिल भरण्यासाठी आठ दिवसांची मुदतही दिली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी (१८ सप्टेंबर) रोजी विद्युत महावितरणाने पेरणे परिसरातील शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता न्हावी, सांडस, पिंपरी सांडस, सांगवी सांडस, तुळापूर, लोणीकंद (ता. हवेली) आणि परिसरातील ७० ते ७५ विद्युत फीडर बंद केले होते. त्यामुळे पूर्व हवेलीमधील या गावांचा वीजपुरवठा अचानकच खंडित झाला. कोरोनाचे संकट, लहरी पाऊस व पडलेले शेती बाजारभावाबद्दल अनिश्चितता यामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेला पुर्व हवेलीमधील शेतकरी या कारवाईने हतबल झाला.
वीज वितरण कंपनीच्या या कारवाई विरुध्द हवेली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदीप भोंडवे आणि सहकाऱ्यांनी पेरणे येथील विद्युत महावितरणच्या कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता मोरे साहेब यांची भेट घेऊन २४ तासात वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. त्यामुळे आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत उपकार्यकारी अभियंता जाधव यांनी आज (सोमवारी) जि. प. माजी अध्यक्ष प्रदीप कंद व भाजपाचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे यांची भेट घेऊन चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासंदर्भात विनंती केली व वीज बिल भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देत फीडर चालू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दीपक भोंडवे यांनी पिंपरी सांडस येथील बनकरवस्त वरील फीडरवर सहाय्यक अभियंता अकुंश मोरे यांच्या समेवत जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत केला.
--
कोट
शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त होत्या. त्यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. खंडित विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहेच. शेतकऱ्यांनी विद्युत बिले भरण्यास सहकार्य करावे.
अंकुश मोरे,
सहाय्यक अभियंता, विद्युत महावितरण
----------
फोटो क्रमांक : २२लोणीकंद वीज बिल
फोटो ओळी- हवेली तालुक्याच्या विविध गावात जाऊन महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी फीडर चालू करताना यावेळी संदीप भोंडवे व इतर कार्यकर्ते