दंड भरू, पण बाहेर फिरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:45+5:302021-06-02T04:09:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सर्वत्र गेल्या दोन महिन्यांपासून निर्बंध असताना विनाकाम बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात सर्वत्र गेल्या दोन महिन्यांपासून निर्बंध असताना विनाकाम बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला समजावून सांगण्याच्या प्रयत्न केला. परंतु, तरीही गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे मे महिन्यात पोलिसांनी विनाकाम बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला. गेल्या महिन्याभरात तब्बल सव्वा लाख पुणेकरांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
पुणे शहरात ९६ ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती.
एप्रिल महिन्यात साधारण दिवसाला एक हजार जणांवर कारवाई केली जात होती. तसेच, मे पहिल्या आठवड्यात सरासरी १२०० जणांवर कारवाईला सुरुवात केली. मात्र, सहा मेनंतर कारवाई चारपट वाढविली. दिवसाला साधारण ४ हजारांवर कारवाई केली जाऊ लागली. पहिल्या सहा दिवसांत ७ हजार जणांवर कारवाई केली आहे. ६ ते २३ मे दरम्यान ९१ हजार जणांवर कारवाई केली आहे. तर, मे महिन्यात तब्बल सव्वा लाख नागरिकांवर कारवाई करण्यात आली.
कारणे नेहमीचीच
नाकाबंदीत सर्व वाहनांची तपासणी केली जात होती. घराबाहेर पडण्याचे कारण विचारले जात होते. त्यात अनेक जण भाजीपाला आणण्यासाठी गेलो होतो. नातेवाईक आजारी आहेत, त्यांच्या मदतीसाठी गेलो होतो. कामावरून घरी जात आहे, अशी कारणे सांगत होते. त्यांच्या कारणाची पडताळणी केली जात होती. योग्य कारण आढळून आल्यास त्यांना सोडण्यात येत होते. बाकींच्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यातून काही ठिकाणी वादावादीचे प्रसंगही घडले. पोलीसमित्र हातात काठी घेऊन अरेरावी करतात, अशा तक्रारीही झाल्या. त्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. मे महिन्याच्या अखेरीस पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाली होती. परिणामी, शहरातील कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली. त्यामुळे १ जूनपासून निर्बंध कमी करण्यात आले आहे.
शहरातील नाकाबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची इतर ठिकाणांप्रमाणे पुण्यात कोरोना चाचणी करण्यात आली नाही. वारजे परिसरात एका ठिकाणी अशी कारवाई करण्यात आली. त्यात २ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते.
आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. निर्बंध सैल केल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण वाढू नये, यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर दुपारी ३ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकदा कमी झालेली बाधितांची संख्या पुन्हा वाढली तर पुन्हा निर्बंध वाढविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेऊन कामापुरतेच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.....
* १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान शहरात ६८४ जणांवर १८८ नुसार कारवाई करण्यात आली.
* आतापर्यंत ४ लाखांहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल २० कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
* १ जून रोजी दिवसभरात विनामास्क व इतर कारणावरून ३२८१ जणांवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून १५ लाख ८३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.