कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापलेला विम्याचा हप्ता तत्काळ भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:58+5:302021-05-28T04:08:58+5:30
लोकमत इफेक्ट लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एसटी महामंडळाच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून विमा व पीएफचा हप्ता कापला. मात्र तो ...
लोकमत इफेक्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एसटी महामंडळाच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून विमा व पीएफचा हप्ता कापला. मात्र तो भरलेला नाही, अशा सर्व कर्मचाऱ्यांचे हप्ते तत्काळ वर्ग करा, असा आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने गुरुवारी दिला. मध्यवर्ती कार्यालयाच्या वित्त विभागाने ती रक्कमदेखील राज्यातील सर्व विभागांकडे वर्ग केली आहे. ‘लोकमत’ने हे वृत्त १६ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते.
एसटी प्रशासनाने मागील चार महिन्यांपासून आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून विम्याचा हप्ता कापला होता. मात्र, तो विमा कंपनीकडे वर्ग केला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली होती.
एसटीच्या या कारभारमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत होती. ‘लोकमत’ने हा प्रश्न मांडल्यानंतर एसटी प्रशासनाने दखल घेऊन गुरुवारी वित्त विभागाकडून त्यासाठीचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची भविष्याची सुरक्षितता अबाधित राहण्यास मदत होणार आहे.
कोट :
कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता. प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी काँग्रेस, मुंबई
फोटो - लोकमत ईफेक्ट