'घरासाठी ५ लाख रुपये दे, नाही तर...' हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 09:32 AM2023-01-10T09:32:38+5:302023-01-10T09:32:49+5:30
मुंबईतील कळंबोली येथील एका ३० वर्षांच्या तरुणीवर गुन्हा दाखल
पुणे : ऑनलाइन ॲपद्वारे ओळख झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढले. शारीरिक संबंध प्रस्थापित करून बदनामीची धमकी देत बँकेत उपव्यवस्थापक असलेल्या तरुणाकडून खंडणीची मागणी केली.
याप्रकरणी कल्याणीनगर येथील एका ३२ वर्षीय तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतील कळंबोली येथील एका ३० वर्षांच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार जून २०२१ पासून सुरू होता.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे एका बँकेत उपव्यवस्थापक आहेत. त्यांची व आरोपी महिलेची स्टार मेकर या ऑनलाइन ॲपद्वारे ओळख झाली. त्यानंतर तिने फिर्यादींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्या कल्याणीनगर येथील घरी येणे-जाणे सुरू झाले. पुढे फसवणूक करून फिर्यादी व त्यांचे नातेवाइकांचा मानसिक छळ केला. २७ डिसेंबर २०२२ रोजी ती फिर्यादीकडे आली. घरासाठी ५ लाख रुपये दे, नाही तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार करून तुला व तुझ्या घरच्यांना गुन्ह्यात अडकवून टाकेन, मी आत्महत्या करेल, अशी धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली. येरवडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.