लाईट बिलाची थकबाकी भरा अन् सवलत मिळवा, उरले फक्त १० दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 01:23 PM2022-03-22T13:23:28+5:302022-03-22T13:27:29+5:30
कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून मूळ थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे
पुणे : कृषीपंपाच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून मूळ थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यातील ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठीची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत आहे. पुणे केले. जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार २२० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. त्यातील ४३ हजार ३७८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल कोरे केले आहे. ५० टक्के सवलतीसाठी फक्त शेवटचे १० दिवस उरले आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले.
दरम्यान पुढील तीन महिन्यांमध्ये थकबाकीमुळे कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करणार नाही. योजनेत सहभागी होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना महावितरणकडून वीजबिलांच्या तात्काळ दुरुस्तीसह सर्व प्रकारचे कार्यालयीन सहकार्य जलदगतीने देत आहे. सुधारित थकबाकीच्या रकमेत ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी ३१ मार्चपूर्वी थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे.
चालू वीजबिल व थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून वीजबिल कोरे करावे तसेच कृषी आकस्मिक निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्र व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांना हातभार लावावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.