PCMC | राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘जम्बो भरती’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:45 PM2023-03-25T13:45:40+5:302023-03-25T13:47:37+5:30

शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडून जम्बो नोकर भरती केली जाणार आहे...

pcmc If the state government gives the green light, 'jumbo recruitment' in the municipal corporation | PCMC | राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘जम्बो भरती’

PCMC | राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘जम्बो भरती’

googlenewsNext

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहराचा होणारा विस्तार तसेच वाढलेला कामाचा ताण लक्षात घेऊन आकृतिबंधामध्ये सुधारणा केली आहे. सुरुवातीला महापालिकेच्या आकृतिबंधात एकूण ११ हजार ५१३ विविध पदांना मंजुरी मिळाली होती. आकृतिबंधात सुधारणा करून पुन्हा पदसंख्या वाढविली आहे. त्यात तब्बल ५ हजार ३२५ पदांची निर्मिती केली आहे. त्यामुळे तब्बल १६ हजार ८३८ पदांचा सुधारित आकृतिबंध तयार झाला आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडून जम्बो नोकर भरती केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाला आहे. तसेच, वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिक संख्येने अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आकृतिबंध तयार आहे. त्यात विविध गटांतील एकूण १६ हजार ८३८ पदे आहेत. पूर्वीच्या आकृतिबंधाच्या तुलनेत ५ हजार ३२५ पदांची नव्याने निर्मिती केली आहे.

दरम्यान, जुना आकृतिबंध तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात तयार केला होता. त्या काळातच त्या आकृतिबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, नोकरभरतीस बंदी असल्याने तसेच कोरोना महामारीमुळे ती पदे भरता आली नाहीत. केवळ वैद्यकीय, आरोग्य तसेच अत्यावश्यक विभागातील नोकर भरतीस राज्य शासनाने हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे ११ हजार ५१३ पैकी केवळ ७ हजार ५३ पदे सध्या कार्यरत होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.

अधिवेशन झाल्यानंतर मान्यता?
नव्या आकृतिबंधाचा प्रस्ताव नुकताच राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास महापालिका ही जम्बो नोकर भरती प्रक्रिया राबविणार आहे. प्रथम अत्यावश्यक विभागातील पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

मे महिन्यात होणार ‘ही’ भरती
महापालिकेच्या वतीने खासगी संस्थेमार्फत वैद्यकीय विभागातील परिचारिका व इतर पदांसाठी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरोग्य निरीक्षक, अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर व समाजसेवक अशा एकूण ३८६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल १ लाख ३० हजार अर्ज ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा मे महिन्यामध्ये होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुधारित आकृतिबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अधिवेशन झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेमध्ये भरती प्रक्रिया राबवता येईल. त्यामध्ये अत्यावश्यक विभागांमध्ये भरती करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.

 

Web Title: pcmc If the state government gives the green light, 'jumbo recruitment' in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.