पीडीसीए, पीवायसीची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:21 AM2021-02-05T05:21:42+5:302021-02-05T05:21:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीडीसीए आणि पीवायसी हिंदू जिमखाना अकादमी या संघांनी महिला प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीडीसीए आणि पीवायसी हिंदू जिमखाना अकादमी या संघांनी महिला प्रिमीयर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. धीरज जाधव क्रिकेट अकॅडमीने बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित केलेली स्पर्धा गुरुवारपासून सुरु झाली.
उद्घाटनाच्या सामन्यात कर्णधार पार्वती बाकळे हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पीडीसीए (पुणे जिल्हा क्रिकेट संघटना) संघाने सारा क्रिकेट अकादमी संघाचे कडवे आव्हान तीन चेंडू राखून परतावून लावले. साराने ५ बाद १३४ धावा केल्या. या आव्हानासमोर पीडीसीएला संघर्ष करावा लागला. अंतिम टप्प्यात पार्वतीने स्वाती शिंदे आणि श्रुती भांबुर्डेकर यांना प्रत्येकी दोन चौकार मारले आणि विजय आवाक्यात आणला. साराच्या श्रुती भांबुर्डेकरने सलामीला येत नाबाद अर्धशतकी खेळी करीत लक्षवेधी कामगिरी नोंदविली.
दुसऱ्या एकतर्फी सामन्यात पीवायसीने श्री स्वामी समर्थ क्रिकेट अकादमीवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. स्वामी समर्थ अकादमीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मात्र त्यांचा डाव ७२ धावांत आटोपला. ऑफस्पीनर श्रावणी शिंत्रे हिने १४ धावांत चार बळी घेतले. पीवायसीकडून मनाली कुलकर्णी-प्रगती धावडे यांनी ५९ धावांची सलामी देत विजय औपचारिक केला. त्याआधी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत १२ संघांचा सहभाग असून त्यात पूनम राऊत, मोना मेश्राम, अनुजा पाटील, तेजल हसबनिस, देविका वैद्य या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा समावेश आहे.