Election: PDCC निवडणूकीची अंतिम मतदार यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 06:14 PM2021-09-28T18:14:10+5:302021-09-28T18:14:45+5:30
पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, धुळे-नंदुरबार, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई व लातूर अशा १० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची रखडेलेली निवडणूक याच पद्धतीने जाहीर होणार
पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आता येत्या १० दिवसात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती होऊन त्यांच्याकडून निवडणूकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाईल. पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, धुळे-नंदुरबार, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई व लातूर अशा १० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची रखडेलेली निवडणूक याच पद्धतीने जाहीर होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूकांना स्थगिती दिली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत पुर्ण होऊनही वर्ष झाले आहे. अन्य सहकारी बँकांच्या संचालक मंडळांची मुदतही संपलेली आहे. सर्वच सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त करणे शक्य नसल्याने कायद्यातील तरतुदीचा आधार घेत सरकारने विद्यमान संचालक मंडळालाच मुदत संपल्यानंतरही कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.
''राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी ही माहिती दिली. मार्च २०२० नंतर मुदत संपलेल्या सहकारी गृहनिर्माण व अन्य संस्थांची राज्यातील संख्या आता ४५ हजार झाली आहे. त्यांच्याही निवडणूकीचे प्राधिकरणाने ६ टप्पे केले आहेत. त्यांची निवडणूक प्रक्रियाही निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त झाल्यानंतर याच पद्धतीने पुढे सुरू होईल असे गिरी म्हणाले. तसेच अलीकडेच मुदत संपली अशा राज्यातील आणखी २५ हजार सहकारी संस्थांचीही निवडणूक लवकरच घेण्यात येणार आहे असे गिरी यांनी सांगितले.''
''त्याशिवाय २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी संस्थांसाठी प्राधिकरणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पॅनेल तयार केले आहे. या संस्थांनी त्या पॅनेलमधील अधिकाऱ्याची निवड करून त्यांच्या अधिपत्याखाली आपल्या संस्थेची मागील दोन वर्ष रखडलेली पंचवार्षिक निवडणूक घ्यायची आहे. या संस्थांचा प्राधिकरणाने स्वतंत्र गट केला आहे. पहिल्या तसेच दुसऱ्या गटातील सहकारी संस्थांनाही निवडणूक घेताना कोराना संदर्भात सरकारने केलेल्या आरोग्यविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल, तशा सुचना सर्व संस्थांना केल्या आहेत अशी माहिती गिरी यांनी दिली.''