डाऊन सिंड्रोमवर मात करीत यशाचे शिखर
By admin | Published: May 28, 2015 12:33 AM2015-05-28T00:33:41+5:302015-05-28T00:33:41+5:30
डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असूनही जलतरण खेळात प्रावीण्य मिळविलेल्या ऋत्विकने आपल्या जिद्दीच्या जोरावर स्विमिंगची आवड जोपासत बारावी परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविले.
राजानंद मोरे ल्ल पुणे
डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असूनही जलतरण खेळात प्रावीण्य मिळविलेल्या ऋत्विकने आपल्या जिद्दीच्या जोरावर स्विमिंगची आवड जोपासत बारावी परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविले. त्याचे हे यश डोळे दिपवून टाकणारे आहे. त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. कारण लॉस एंजिल्सला होणाऱ्या स्पेशल आॅलिंपिक्स वर्ल्ड समर गेम्स स्विमिंग या स्पर्धेसाठी भारतातून चार मुलांची निवड झाली त्यापैकी ऋत्विक जोशी आहे.
ऋत्विक हा आपटे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याने एमसीव्हीसीच्या इलेक्ट्रीकल मेटेनन्स ट्रेडमधून बारावीच्या परीक्षेमध्ये ५७.७१ टक्के गुण मिळवून यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, त्याला उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी मदतनिसाची गरज पडली नाही, घरीच त्यांच्या आईने त्यांचा अभ्यास घेतला. रोज चार तास तो नियमित अभ्यास करायचा.
एकीककडे बारावीचा अभ्यास एकीकडे जलतरणाचा सराव, अशी तारेवरची कसरत तो करत होता. त्याने जलतरणाच्या अनेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले असून, त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा जुलैमध्ये होणार असून, या स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी तो सध्या चेन्नईला आहे. त्याचे आई-वडील माधवी व अभिजित जोशी यांनी त्याला दूरध्वनीवरून निकाल कळविला. निकाल ऐकून तोही आनंदित झाल्याचे त्यांनी सांगितले.
1अभिजित जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगतिले की, त्याला जन्मत: डाऊन सिंड्रोम हा आजार असल्यामुळे, तो शिक्षण घेऊ शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगूनसुद्धा केवळ आईच्या विश्वासामुळे त्याला शाळेत टाकले. आज हा विश्वास सार्थक झाल्यासारखा वाटतो. त्यांच्या आईने त्याच्याशी कोणत्या पद्धतीने बोलले पाहिजे यांचा अभ्यास केला. यासाठी हैदराबादवरुन काही पुस्तके मागविली आणि घरीसुद्धा त्याप्रकारचे वातावरण तयार केले. त्यामुळे आम्ही त्याला वयाच्या सहाव्या वर्षांपासून स्विमिंग क्लासला पाठविले, सुरुवातीला त्याला अनेक अडचणी आल्या, पण त्याची शिकण्याची आवड पाहून आम्ही थक्क झालो.
2‘माझ्या मुलाला मी कधी गतिमंद समजलेच नाही, त्यानेसुद्धा सर्वसामान्य मुलांप्रमाणे खेळावे-शाळेत जावे, असेच मला वाटायचे. त्यासाठी मी खूप धडपड केली कधी हार मानली नाही,’ असे माधवी जोशी यांंनी सांगितले. ऋत्विकच्या यशाबद्दल त्याचे महाविद्यालयातील शिक्षक गिरीश चांदेकर व जलतरण प्रशिक्षक सौरभ देशपांडे यांनीही आनंद व्यक्त केला.