चाऱ्याच्या शोधात मोर व लांडोर मानवी वस्तीत
By Admin | Published: June 30, 2017 03:33 AM2017-06-30T03:33:22+5:302017-06-30T03:33:22+5:30
पाणी व चाऱ्याच्या शोधात बुधवारी (दि. २८) एक मोर आणी लांडोर मानवी वस्तीत आल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी या ठिकाणी मुक्काम ठोकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळवंडी : पाणी व चाऱ्याच्या शोधात बुधवारी (दि. २८) एक मोर आणी लांडोर मानवी वस्तीत आल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी या ठिकाणी मुक्काम ठोकला आहे.
बेसुमार जंगलतोड झाल्यामुळे जंगलातील प्राणी व पक्षी यांना चारा व पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जंगलातील बिबटे, तरस, रानमांजर आदी प्राणी चारा व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. आता या प्राण्यांबरोबरच पक्ष्यांनीही स्थलांतरास सुरवात केली असून, भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जाणारा मोर आणि लांडोर यांची जोडी गेल्या दोन दिवसांपासून चाळकवाडी व परिसरात आली आहे. या जोडीने कधी कुणाच्या घरावर तर कधी झाडांवर आश्रय घेत संपूर्ण दिवस परिसरात घालविला. या वेळी येथील ग्रामस्थांनी त्यांना धान्याच्या रुपाने चारा दिला. वडगाव आनंदजवळ असलेल्या कळमजाईच्या मंदिराजवळ असलेल्या जंगलातून हा मोर व लांडोर आल्याची चर्चा आहे.