चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यात यावा : चंद्रकांत पाटील
By निलेश राऊत | Published: August 19, 2023 06:18 PM2023-08-19T18:18:14+5:302023-08-19T18:19:20+5:30
या नवीन पुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे....
पुणे: चांदणी चौकात (एनडीए चौक) प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पादचारी पूल उभारण्याची विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौक प्रकल्पाचे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या नवीन पुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे.
सदर भागात पाषाण-बावधन-कोथरुडकडून मुंबईकडे आणि मुळशीकडून सातारा व पाषाण-कोथरुडकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे याठिकाणी पादचारी पूल उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे.
चांदणी चौकाच्या प्रकल्पाच्या मूळ प्रस्तावात पादचारी पूलचा समावेश नव्हता. त्यामुळे पाषाण ते मुळशी दरम्यान नवीन पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजूरीसाठी पाठविण्यात आला असल्याचेही पाटील यांनी सांगितले.