गुन्हेगारांच्या भांडणात पादचारी सुरक्षारक्षकाचा मृत्यू, फुरसुंगीत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 10:34 PM2019-08-13T22:34:28+5:302019-08-13T22:34:35+5:30
दोन गटात सुरू असलेल्या भांडणातून झालेल्या गोळीबारात गोळी लागून रस्त्यावरून पायी जाणा-या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.
पुणे : दोन गटात सुरू असलेल्या भांडणातून झालेल्या गोळीबारात गोळी लागून रस्त्यावरून पायी जाणा-या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. पंचय्या सिद्धय्या स्वामी (वय ५८, रा़ गंगानगर, फुरसुंगी) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. ही घटना फुरसुंगी गावातील गंगानगर येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी, पंचय्या स्वामी हे एका सहकारी बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. काम संपवून ते घरी जात होते. त्यांच्या घरापासून काही अंतरावर मयुर गुंजाळ व तेजाब कल्याणी यांच्यामध्ये जुन्या वादातून भांडणे सुरू होती. त्यावेळी तेजाबने आपल्याकडील पिस्तुलातून मयुरच्या दिशेने गोळीबार केला. पण गोळी मयुरला न लागता तेथून जाणाऱ्या पंचय्या स्वामी यांच्या मांडीला दोन गोळ्या लागल्या. ते तेथेच खाली पडले. स्वामी यांना गोळी लागल्याचे पाहताच दोघेही पळून गेले. तेथील नागरिकांनी स्वामी यांना रिक्षात घालून हडपसर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने त्यांना नोबेल हॉस्पिटलला नेले. परंतु डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अतिरक्तस्त्रावामुळे स्वामी यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
मयुर गुंजाळ आणि तेजाब कल्याणी हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. फुरसुंगीमधील या दोन गटात त्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तेथील बंदोबस्तात वाढ केली आहे. गुंजाळ आणि कल्याणी याच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरात झडती घेण्याचे काम सुरू केले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत. गुन्हेगारीशी कोणताही संबंध नसताना गुन्हेगारांच्या भांडणात एका सुरक्षारक्षकाला मात्र आपला प्राण गमविण्याची पाळी आली.