ट्रकने धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 09:05 PM2019-09-10T21:05:24+5:302019-09-10T21:09:02+5:30
एका ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला असून हा अपघात सोमवारी रात्री बाराच्या सुमारास मुंबई - बंगळुरू महामार्गावरील वडगांव बुद्रुक येथील हॉटेल मुरली व्हेजसमोर झाला.
पुणे (नऱ्हे ): एका ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला असून हा अपघात सोमवारी रात्री बाराच्या सुमारास मुंबई - बंगळुरू महामार्गावरील वडगांव बुद्रुक येथील हॉटेल मुरली व्हेजसमोर झाला. अपघातानंतर ट्रकसह चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .याप्रकरणी पोलीस हवालदार घनश्याम निगडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई - बंगळुरू महामार्गावरील वडगांव बुद्रुक येथील हॉटेल मुरली व्हेजसमोरील रस्त्यावरून रात्री बारा वाजणेच्या सुमारास उमेशसिंह कल्लुसिंह बोहरा (वय ३८, कोंढवा, पुणे) हे पायी चालत रस्ता ओलांडत होते. त्यावेळेस पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने (एम एच ०४, एच वाय २३९९) जोराची धडक दिली. या अपघातात उमेशसिंह हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर ट्रकचालक नौशाद इकबाल अन्सारी (वय २६, रा. रामपूर, ता. मधुबन, जिल्हा मऊ, उत्तरप्रदेश) याला घटनास्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून उमेशसिंह यांना ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध हयगयीने, बेदरकारपणे ट्रक चालवून धडक देऊन गंभीररीत्या जखमी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद महांगडे करीत आहेत.