वाहतूककोंडीने गुदमरला जीव
By admin | Published: April 17, 2017 06:31 AM2017-04-17T06:31:31+5:302017-04-17T06:31:31+5:30
पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी ही नित्याची बाब झाली आहे. मात्र, नगर रस्त्यावर वाहतूककोंडी कोणत्याही वेळेला होऊ शकते
चंदननगर : पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी ही नित्याची बाब झाली आहे. मात्र, नगर रस्त्यावर वाहतूककोंडी कोणत्याही वेळेला होऊ शकते, अगदी रात्री दहानंतरदेखील. हा अनुभव वाहनचालकांनी शनिवारी (दि. १५) घेतला. त्यामुळे नगर रस्त्यावर खराडी-बायपास चौकात नागरिकांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागले.
शनिवारी रात्री साडेअकरानंतर खराडी-बायपास चौकात प्रचंड कोंडी झाली होती. ही कोंडी सोडवण्यासाठी तब्बल तीन तास गेले. खराडी बायपास चौकातील वाहतूक पोलीस अकरा वाजता जाताच लगेच वाहतूककोंडी होत असते. या ठिकाणी अतिशय बेशिस्त वाहने चालविली जातात. परिणामी कोंडी होते. शनिवारीही रात्री साडेअकरापासून मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत प्रचंड कोंडी झाली. यात बायपासपासून ते टाटा गार्डपर्यंत बीआरटी मार्गासह वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर बायपासपासून खराडी चौकापर्यंत रांगा लागल्या होत्या. बायपासपासून जकातनाक्यापर्यंत प्रचंड रांगा लागल्या होत्या. यात दोन्ही बाजूचे बीआरटी मार्गही जॅम झाले होते. या कोंडीत तीन रुग्णवाहिका अडकल्याने चौकात मोठा गोंधळ झाला होता.
चौकात वाहनांना शिस्त लावणे गरजेचे आहे. खासगी वाहनचालकाने रात्रीच्या कोंडीत रुग्णवाहिकेलाही कार आडवी करत अडथळा निर्माण केला. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या चौकातील सततच्या वाहतूककोंडीमुळे परिसरातील नागरिकांनाही प्रचंड त्रास होत आहे. कोंडीमुळे हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांची झोप उडत आहे. या समस्येवर कायमचा तोडगा काढणे गरजेचे आहे.
वाहतूक पोलिसांची वेळ वाढवणे गरजेचे आहे. कारण चौकातील वाहतूक पोलीस जाताच कोंडी होत आहे. तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिग्नलच्या बॅटऱ्या खराब झाल्या असून त्या बदलणे गरजेचे आहे. त्याऐवजी सिग्नल हे विजेवर चालविल्यास वाहतूक नियमांचे पालन काही प्रमाणात होईल. चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे कोंडी होत आहे. (वार्ताहर)