रस्त्यांवरच पादचारीच उपेक्षित

By Admin | Published: March 21, 2017 05:38 AM2017-03-21T05:38:28+5:302017-03-21T05:38:28+5:30

रस्त्यावर पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असे म्हटले जाते. परंतु, हा अधिकार केवळ बोलण्यापुरताच मर्यादित राहिला आहे.

The pedestrians neglected on the streets | रस्त्यांवरच पादचारीच उपेक्षित

रस्त्यांवरच पादचारीच उपेक्षित

googlenewsNext

पुणे : रस्त्यावर पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असे म्हटले जाते. परंतु, हा अधिकार केवळ बोलण्यापुरताच मर्यादित राहिला आहे. रस्त्याचा हा पहिला मानकरी रस्ते अपघातात सर्वाधिक बळी ठरणारा घटक आहे. पुण्यातल्या रस्त्यांवर वर्षाला साधारणपणे १२0 पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे कटू वास्तव आहे. जागोजाग अतिक्रमणांनी वेढलेले पादचारी मार्ग, पदपथ यामुळे नाईलाजास्तव पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालत जावे लागते. नियोजनबद्ध पदपथ असतील तर कदाचित अनेक निष्पापांचे प्राण वाचू शकतील.
शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्यांसह, नेहरू रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापूर आणि नगर रस्ता, सातारा रस्ता, या रस्त्यांवर पादचारी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या प्रमुख रस्त्यांसह मध्यवर्ती आणि उपनगरांमधील अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आणि बेकायदा पार्किंग होत असल्यामुळे पादचाऱ्यांची अडचण झाली आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवरच्या पदपथावरूनही पादचाऱ्यांना चालत जाण्याची स्थिती सध्या तरी नाही. याकडे महापालिका आणि पोलीस दोघांकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. नित्याचीच झालेली वाहतूककोंडी आणि मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यांवरच्या या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यांवरुन चालावे लागते.
वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, पुण्याला दरवर्षी जे अपघाती मृत्यू होतात, त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण पादचाऱ्यांचे असते. त्यासोबतच दुचाकी चालकांच्या मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. पादचारी मार्गांवरुन चालणे कठीण होऊन बसले असून, पदपथांवर आणि लगत लागणारी वाहने, पथारी यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. वयोवृद्ध नागरिक, गरोदर स्त्रिया, अपंग आणि लहान मुलांना जिवाचा धोका पत्करून रस्त्यांवरुन चालत जावे लागते. रस्ता ओलांडण्यासाठी सुयोग्य आखणी केलेले झेब्रा क्रॉसिंगही अनेकदा उपलब्ध नसतात. त्यामुळेही अपघाताचा धोका संभवतो. प्रशासकीय दुर्लक्षाचे बळी ठरत असलेल्या पादचाऱ्यांच्या हक्कांबाबत मात्र नागरिकच उदासीन आहेत. महापालिकेकडूनही अतिक्रमणांवर नाममात्र कारवाई केली जाते. कारवाई नंतर अवघ्या एक-दोन दिवसांतच पुन्हा स्थिती जैसे थे होऊन बसते. पादचारी अनेकदा पथारीवाल्यांशी, अतिक्रमण करणाऱ्यांशी वाद घालतात, मात्र मुजोर दुकानदार, पथारीवाले, पार्किंग करणारे पादचाऱ्यांनाच दमात घेतात. घाईगडबडीत निघालेले दुचाकीचालक तर रस्त्यावर कोंडी झालेली असल्यास थेट वाहने पदपथावरच घालतात. वाहतूक शाखा आणि मनपाने संयुक्त अभियान राबवत पादचाऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. स्वारगेट चौक, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शनिपार चौक, मंडई आदी भागांमध्ये त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी तर पादचारी सिग्नल्सच नाहीत.

Web Title: The pedestrians neglected on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.