‘पिफ’मध्ये सात मराठी चित्रपटांत होणार चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 03:29 AM2018-01-05T03:29:27+5:302018-01-05T03:29:47+5:30
‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपट निवडले गेले आहेत. पिफच्या परीक्षण समितीकडे आलेल्या ४७ चित्रपटांपैकी सात चित्रपटांची निवड करण्यात आली.
पुणे - ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपट निवडले गेले आहेत. पिफच्या परीक्षण समितीकडे आलेल्या ४७ चित्रपटांपैकी सात चित्रपटांची निवड करण्यात आली. यामध्ये ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’, ‘कच्चा लिंबू’ अशा प्रदर्शित आणि ‘पिंपळ’, ‘झिपºया’, ‘नशीबवान’ आणि ‘म्होरक्या’ असे अप्रदर्शित चित्रपटांचा समावेश आहे.
११ ते १८ जानेवारी दरम्यान होणाºया पिफ महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी ही माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समर नखाते, निवड समिती सदस्य अभिजित रणदिवे, निवड समिती सदस्य मकरंद साठे, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम आदी यावेळी उपस्थत होते.
महोत्सवात दाखवल्या जाणाºया चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून आठ चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पोलंडच्या दिग्दर्शिका जोआना कोस्क्राऊझ, श्रीलंकेचे दिग्दर्शक व एफटीआयआयचे माजी विद्यार्थी विमुक्थी जयासुंदरा, मेक्सिकोचे दिग्दर्शक रॉड्रिगो प्ला, कॅनडा येथील दिग्दर्शक मॅथ्यू डेनिस, इटलीचे दिग्दर्शक मॉरिझिओ निकेती, इराणी अभिनेत्री गेलारेह अब्बासी, हिंदी चित्रपटांचे लेखक कमलेश पांडेय, मल्याळम दिग्दर्शक बिजूकुमार दामोदरन यांचा समावेश आहे.
पिफमध्ये रसिक व अभ्यासकांसाठी ‘पिफ फोरम’ हा खास विभाग ठेवला आहे. चित्रपटांशी संबंधित मान्यवर व्यक्तींची व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमधून चित्रपटांच्या विविध अंगांची माहिती घेता येईल. हे फोरम महोत्सवाच्या सिटीप्राईड कोथरूडच्या आवारात उभारण्यात येणार आहे.
‘पिफ’ फोरममध्ये आयोजित कार्यक्रम
विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान- विषय- पटकथा लेखन, वक्ते- मेक्सिकोचे दिग्दर्शक रॉड्रिगो प्ला, इटलीचे दिग्दर्शक मॉरिझिओ निकेती आणि हिंदी पटकथा लेखक कमलेश पांडेय
व्याख्यान- राज कपूर आणि संगीत- सुश्रुत वैद्य
चर्चासत्र- राज कपूर आणि त्यांचे चित्रपट- दिग्दर्शक सुभाष घई
कार्यशाळा- डिजिटल पोस्ट प्रॉडक्शन- अँन ओव्हरव्ह्यू- मोहन कृष्णन
चर्चासत्र- चित्रपटांचे जतन- काळाची गरज- मोहन कृष्णन व प्रकाश मगदूम
परिसंवाद- ‘फेट आॅफ मराठी सिनेमा’- वक्ते- संजय पाटील, संजय छाब्रिया व नितीन वैद्य
चित्रपट निर्मिती कार्यशाळा- श्रीलंकेचे दिग्दर्शक विमुक्थी जयासुंदरा
व्याख्यान- कंटेम्पररी अर्जेंटाईन सिनेमा- लुआंडा फर्नांडिस
व्याख्यान- ट्रेंडस इन द सिनेमा अँड मल्टीप्लेक्स बिझनेस- राहुल पुरी
व्याख्यान- प्रॉडक्शन डिझायनिंग
शायरी व गीतांचा कार्यक्रम- सुखन- ओम भूतकर व सहकारी
नजीकच्या कालखंडात निधन झालेल्या मान्यवर कलाकारांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ‘मेरा गाव मेरा देश’ (अभिनेते विनोद खन्ना), ‘मैंने प्यार किया’ (अभिनेत्री रीमा), ‘न्यू दिल्ली टाईम्स’ (अभिनेते शशी कपूर), ‘कभी हा कभी ना’ (दिग्दर्शक कुंदन शहा) आणि ‘आर पार’ (अभिनेत्री श्यामा) हे चित्रपट ‘पिफ’मध्ये रसिकांना बघायला मिळणार आहेत. याशिवाय स्त्रियांच्या समर्थ भूमिका असणारे ‘तीन कन्या’ (सत्यजीत रे), ‘शंकराभरणम’ (के. विश्वनाथ), ‘गेज्जे पूजे’ (पुतन्ना कनगल), ‘परिणिता’ (बिमल रॉय), ‘अवरगल’ (के. बालचंदर) या चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे.
यंदाच्या पिफमधील बरेच चित्रपट एनएफआयमध्ये दाखवले जाणार आहेत. इतर थिएटरमध्ये संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. एनएफआयमध्ये संध्याकाळी ७-९ आणि ९-११ या दोन स्लॉटमध्येही चित्रपट दाखवले जातील.