पेन इंटरनॅशनल काँग्रेस आजपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 01:59 AM2018-09-25T01:59:18+5:302018-09-25T01:59:33+5:30
हस्तकला प्रदर्शन, चिंतनात्मक व्याख्यान, स्मृतीस्थळांना भेट, काव्यवाचन, चर्चासत्र, नाटक अशा विविध कार्यक्रमांनी नटलेली पेन इंटरनॅशनल काँग्रेसला आजपासून (२५ सप्टेंबर) पुण्यात सुरुवात होत आहे.
पुणे : हस्तकला प्रदर्शन, चिंतनात्मक व्याख्यान, स्मृतीस्थळांना भेट, काव्यवाचन, चर्चासत्र, नाटक अशा विविध कार्यक्रमांनी नटलेली पेन इंटरनॅशनल काँग्रेसला आजपासून (२५ सप्टेंबर) पुण्यात सुरुवात होत आहे. भारतात पहिल्यांदाच हे अधिवेशन होत असून, पेनच्या ८७ केंद्रातील आणि ६० हून अधिक देशांतील लेखक पुण्यात दाखल झाले आहेत. दुपारी ३ वाजता आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा गांधी स्मृतीस्थळाला अभिवादन करुन या अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे.
भारतीय लिपी आणि हस्तकला प्रदर्शन, महात्मा फुले स्मारकाला भेट, कला गजर प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, प्रसिद्ध चित्रकार गुलाम शेख यांचे व्याख्यान, हिंदी कवी अशोक वाजपेयी यांचे व्याख्यान, रामदास भटकळ लिखित ‘जगदंबा’ नाटकाचा इंग्रजी एकपात्री प्रयोग, विविध देशातील साहित्यिकांबरोबर चर्चा, केनियाचे विचारक एनगुगी वा थियॉन्ग यांचे चिंतनात्मक व्याख्यान, भारतीय भाषांतील कवी आणि मराठी कवी यांचे काव्यवाचन आदी कार्यक्रमांचा पेन इंटरनॅशनलमध्ये समावेश आहे. पुण्यातील शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, कुलगुरू, प्राध्यापक, प्रकाशक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने भारतात पेन इंटरनॅशनल काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. भारतामध्ये प्रथमच होत असलेल्या या अधिवेशनासाठी ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे. जागतिक साहित्य व्यवहारावर या परिषदेच्य माध्यमातून प्रकाश टाकला जाणार असून, २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान पुण्यात ही परिषद होणार आहे.
आगाखान पॅलेस येथे पुष्पांजली अर्पण करून सिम्बायोसिसच्या विमाननगर येथील कॅम्पसमध्ये दुपारी चार वाजता उद्घाटन सोहळा रंगणार आहे. पेन इंटरनॅशनलच्या अध्यक्षा जेनिफर क्लेमेंट, ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार या वेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर डॉ. देवी यांचे ‘व्हाय पेन, व्हाय पुणे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रामदास भटकळ लिखित ‘कस्तुरबा’ या मूळ नाटकाचा यशोधरा देशपांडे मैत्रा इंग्रजीतील प्रयोग सादर करणार आहेत. कवी, चित्रकार गुलाम मोहम्मद शेख यांच्या हस्ते बुधवारी (२६ सप्टेंबर) जवाहलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी साडेसहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर रिचिंग गांधी इन अवर टाइम्स या विषयावर त्यांचे व्याख्यानही होईल. गुरुवारी (२७ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठात भाषांचे लोकसर्वेक्षण या विषयावरील चर्चासत्रात कल्याणकुमार चक्रवर्ती, विजय कुमार, अरूण जाखडे, इंद्रनील आचार्य, लिसा लोमटाक, बलराम पांडे, शेखर पाठक, राजेश्वरी रामेश्वरय्या यांचा सहभाग आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या दक्षिणायन चर्चासत्रात अरूणा साबणे, प्रमोद निगुडकर, प्रभा गणोरकर बोलणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांचे साहित्य आणि स्वातंत्र्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच यशोधरा देशपांडे मैत्रा जगदंबा नाटक सादर करणार आहेत.
विद्याापीठात शुक्रवारी (२८ सप्टेंबर) दुपारी दोन वाजता जागतिक भाषा वारी काढण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. न्गुंगी वा थिओन्गो यांचे डिकोलोनायझेशन आॅफ लँग्वेज रिलेशनशीप इन वर्ल्ड या विषयावर सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे व्याख्यान होणार असून, हलिना बिट्नेर, वसंत आबाजी डहाके यांच्यासह आंतरराष्ट्रीय कवींचा सहभाग असलेल्या कवी संमेलनाने शनिवारी संमेलनाचा समारोप होणार आहे.