अबबं ! पुण्यात नियम मोडणाऱ्या चालकाला २४ हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 08:28 PM2019-05-11T20:28:53+5:302019-05-11T20:32:24+5:30
पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुणेकरांच्या खोचक पण स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्यांचे पुणेरी टोमणे आणि पाट्याही प्रसिद्ध आहेत. आता तर त्याच्याही पुढे जात पुणेकरांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
पुणे : पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुणेकरांच्या खोचक पण स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्यांचे पुणेरी टोमणे आणि पाट्याही प्रसिद्ध आहेत. आता तर त्याच्याही पुढे जात पुणेकरांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
नियम तोडून गाडी चालवणाऱ्या पुणेरी वाहन चालकाला थोडे थोडक्या नव्हे तर तब्बल २४ हजार २०० रुपयांचा दंड झाल्याचे समोर आले आहे. इतक्या मोठ्या दंडाची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे.नुकतीच पुणे वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कम न भरणाऱ्या चालकांसाठी ‘पी.टी.पी.’ नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार शहर वाहतूक शाखेकडून पुणे ट्रॅफिक पोलिस नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत चौकांमध्ये नाकाबंदी करून ई-चलन मशिनवर वाहनचालकांकडील थकीत दंडाची रक्कम तपासली जात आहे.
एखाद्या वाहन चालकाने दंडाची रक्कम भरली नसेल तर त्याच्याकडून संपूर्ण दंड वसूल करण्यात येत आहे.लष्कर वाहतूक विभागातील पोलिस हवालदार मार्तंड जगताप यांनी गुरुवारी दुपारी नाकाबंदीत एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाला थांबवून माहिती घेतली. त्यावेळी त्या गाडीच्या चालकाने यापूर्वी पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर तब्बल २४ वेळा स्पीड लिमिटचे उल्लंघन केल्याचे समोर आले. त्यापोटी प्रत्येक वेळी एक-एक हजार रुपये असा २४ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. परंतु ती रक्कम भरली नव्हती. त्यामुळे आता त्यांना २४ हजार रुपये भरावे लागणार आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे प्रमुख पंकज देशमुख म्हणाले की, फेब्रुवारीपासून शहरात ए चलन सुरु झाले आहे. त्यामुळे एकाच वेळी संबंधित वाहनावरील सर्व दंड समोर येतो आणि वसुली करणे सुकर होते.