दौंड तालुक्यात लक्षवेधी लढतींवर लागल्या पैजा
By admin | Published: February 17, 2017 04:24 AM2017-02-17T04:24:46+5:302017-02-17T04:24:46+5:30
तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही गटांत आणि गणांत लक्षवेधी निवडणूक होणार आहे. या लढतींकडे सर्वांचे लक्ष
दौंड : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही गटांत आणि गणांत लक्षवेधी निवडणूक होणार आहे. या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. दरम्यान या रणधुमाळीत कोणाची वर्णी मतदारराजा लावेल यावर पैजा लागल्या आहेत.
जिल्हा परिषद गटातील लिंगाळी-मलठण, राहू-खामगाव, केडगाव-पारगाव, खडकी-पाटस या चार गटांसह काही गणांत लक्षवेधी निवडणूक होईल. या गटामधून कोण बाजी मारतो यावर पैजादेखील लागलेल्या आहेत. विशेषकरून केडगाव-पारगाव गटात पैजा लागलेल्या आहेत. या निवडणुकीत विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु काही गण आणि गट वगळता तालुक्यात राष्ट्रवादी, रासप, भाजपा, आरपीआय युती यांच्यात सरळ दुहेरी लढत होईल, अशी परिस्थिती राहील. शिवसेना, काँग्रेस यांसह काही बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांमुळे काही गटांमध्ये निवडणुकीतील चुरस वाढलेली आहे. परिणामी हे उमेदवार राष्ट्रवादी, रासप,भाजपा, आरपीआय युतीच्या उमेदवारांना काही गटांत आणि गणांत पराभवाचा धक्का देऊ शकतात.
लिंगाळी-मलठण या गटातून राष्ट्रवादीचे वीरधवल जगदाळे आणि भाजपाचे केशव काळे यांच्यात दुहेरी लढत होत आहे. वीरधवल जगदाळे यांनी दौंड शुगरच्या माध्यमातून तर केशव काळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या परिसरात ग्रामस्थांशी नाळ जोडलेली आहे. या दोन्ही उमेदवारांना राजकीय वारसा आहे. तसेच मलठण गणात ताराबाई देवकाते या राष्ट्रवादीकडून तर रासपकडून हिराबाई देवकाते आणि शिवसेनेकडून मनीषा सूर्यवंशी यांच्यात तिरंगी लढत आहे.
मनीषा सूर्यवंशी यांचे पती शरदचंद्र सूर्यवंशी यांनी मलठण-लिंगाळी गटातून माघार घेतल्यामुळे त्यांची ताकद पूर्णपणे ते आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी वापरतील असे या गणात बोलले जात आहे. राहू-खामगाव गटात पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा तथा महानंदच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे तर रासपकडून पूनम दळवी यांच्यात दुहेरी लढत होत आहे. परंतु ओबीसी आघाडीच्या योगिता कुदळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या गटात निवडणुकीची रंगत वाढलेली आहे. मात्र या तिहेरी लढतीत कोणाला फटका बसतो हे मात्र गुलदस्तात आहे. (वार्ताहर)