सावधान! वाहनावर दादा, नाना, काका या नावांसह पोलीस, पत्रकार, व्हीआयपी लिहल्यासही दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 09:36 AM2022-08-25T09:36:03+5:302022-08-25T09:37:20+5:30
पुणे वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे...
पुणे : वाहनांच्या नंबरप्लेटसह वाहनावर दादा, मामा, पोलीस असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करीत असतात. अनेक जण वाहनावर नंबर टाकतानाच दादा, नाना, काका या नावांसह पोलीस, पत्रकार, व्हीआयपी असेदेखील लिहितात. मात्र, शासनाने निर्देशित केलेल्या नंबरशिवाय वाहनावर काहीही लिहिणे हा अपराध आहे. तरीदेखील सर्रास अशी वाहने आपल्याला सर्वत्र फिरताना दिसतात. पुणे वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे.
नंबर प्लेटवर काहीही लिहिणे दंडनीय
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाहनावर नंबर टाकणे गरजेचे आहे. काही लोक स्पेशल नंबर घेऊन दादा, मामा, काका असे नंबर टाकताना लिहितात. यासह नंबरप्लेटवर नंबर न टाकता पोलीस, पत्रकार अथवा पक्षाचे चिन्ह टाकतात. अशा वाहनांवर पुणे वाहतूक पोलीस कारवाई करीत असून, पहिल्यांदा पकडल्यावर ५०० आणि दुसऱ्यांदा त्याच वाहनाला पकडले तर १५०० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
१० दिवसांत २८३ जणांवर कारवाई
पुणे वाहतूक पोलिसांनी ११ ते २१ ऑगस्टदरम्यान नियमानुसार नंबर प्लेट नसणाऱ्या २८३ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २ लाख २६ हजार ७०० रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला. तसेच भविष्यातदेखील ही कारवाई सुरू राहणार असून, ज्यांची नंबरप्लेट नियमानुसार नाही त्यांनी नियमानुसार करून घ्यावी; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामाेरे जावे लागेल, असे आवाहनदेखील पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.