येरवड्यातील दरड दुरुस्तीचा प्रस्ताव प्रलंबित
By admin | Published: August 1, 2014 05:20 AM2014-08-01T05:20:21+5:302014-08-01T05:20:21+5:30
येरवड्यातील रामनगर वसाहतीत आज पुन्हा एकदा दरड कोसळली. सुदैवाने दु:खद घटना घडली नाही.
पुणे : येरवड्यातील रामनगर वसाहतीत आज पुन्हा एकदा दरड कोसळली. सुदैवाने दु:खद घटना घडली नाही. परंतु, वर्षभरापूर्वीच महापालिकेने येरवड्यातील दरड कोसळण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनेला परवानगी आणि तीन कोटींच्या निधीचा प्रस्ताव दिला होता. त्याचा अनेकदा पाठपुरावा करूनही शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याची माहिती उजेडात आली आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात येरवड्यात दरड कोसळून रामनगरमधील काही झोपड्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. या घटनेनंतर महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक भिंत बांधण्याचे जाहीर केले. टेकडीचा परिसर वन विभागाच्या अखत्यारित असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी परवानगी आवश्यक होती. तसेच, मुळा आणि मुठा नदीच्या दोन्ही काठांवर पूरनियंत्रण आणि पूरपातळीची माहिती देणारी चिन्हे आणि फलक बसविणे व दरड कोसळू नये म्हणून प्रतिबंधात्मक जाळी व संरक्षक भिंत उभारण्याविषयीचा सुमारे तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. २२ आॅक्टोबर २०१३ ला पाठविलेल्या प्रस्तावाला महसूल व वन विभागाच्या सचिव यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन आठवड्यांपूर्वी प्रलंबित प्रश्नांची आढावा बैठक झाली. त्या वेळी येरवड्यातील दरड प्रतिबंधक व पूरनियंत्रण उपाययोजनांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. शहरातील नैसर्गिक नाल्यातील अतिक्रमण रोखण्यासाठी ‘मॉनेटरिंग सिस्टिम’ तयार करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यासाठी दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणीही महापालिकेने मे २०१२ रोजी मदत व
पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली होती. परंतु, त्यालाही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. (प्रतिनिधी)