सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राडारोडाप्रकरणी अखेर शिपायावर गुन्हा दाखल व निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:06 PM2017-12-27T15:06:48+5:302017-12-27T16:42:40+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बिल्डरला परस्पर राडारोडा आणून टाकण्यास लावणारा विद्यापीठाचा कर्मचारी प्रकाश मागाडे (शिपाई) याच्या विरुद्ध कलम ४२६, ४३१, ४४७, १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बिल्डरला परस्पर राडारोडा आणून टाकण्यास लावणारा विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या पर्यावरणाची हानी करण्याच्या या प्रकरणाची गंभीर दखल विद्यापीठ स्तरावर घेण्यात आली आहे.
प्रकाश माघाडे (वय ५१, रा. सेवक वसाहत, सा. फु. पुणे विद्यापीठ) असे निलंबित करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द कलम ४२६, ४३१, ४४७, १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीच याप्रकरणात अजित जाधव (वय ४०, रा. मॉडेल कॉलनी) व ७ ट्रक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात माघाडे याचे नाव निष्पन्न झाल्याने त्यालाही यामध्ये आरोपी करण्यात आले आहे. चतु: श्रृंगी पोलीस व विद्यापीठ सुरक्षा विभागाच्या अहवालामध्ये माघाडे याच्या सांगण्यावरूनच ट्रक चालकांनी परस्पर राडारोडा विद्यापीठात टाकण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये १३ डिसेंबर रोजी दुपारी राडारोडा भरलेले ७ ट्रक कॅम्पसमध्ये टाकताना गस्तीवरील सुरक्षा रक्षकांनी पकडले होते. गोखले नगर येथील म्हाडा कॉलनीतील राडारोडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये टाकण्यासाठी आणण्यात आला होता. सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ट्रकबाबत चौकशी केली असता विद्यापीठाच्या स्थावर विभागाचा या ट्रकशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे याप्रकरणाला गंभीर वळण प्राप्त झाले होते. सुरक्षा विभागाने सर्व ७ ट्रक ताब्यात घेऊन पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दिली होती.