सलमान खानच्या शर्ट काढण्याला मिळतात टाळ्या; रणधीर कपूर यांची ‘पिफ’मध्ये टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:53 AM2018-01-13T11:53:51+5:302018-01-13T11:58:48+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ (सिंहावलोकन) या विशेष विभागातील ‘शोमॅन’ दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपट सादरीकरणाला ‘बॉबी’ चित्रपटाने शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सुरुवात झाली.
पुणे : एक काळ असा होता, की सामाजिक, आर्थिक परिस्थिती तसेच नात्यांची वीण या सर्वांना वेगळे परिमाण होते. जीवनमूल्य कायम होते. समाजाप्रमाणे चित्रपट निघत होते. विषय हा चित्रपटाचा गाभा होता. आजची परिस्थिती बदलली आहे. सलमान आणि करिष्मा कसले कपडे घालतात. सलमानच्या शर्ट काढण्याला टाळ्या पडतात. ओढणी नव्हती म्हणून ‘बरसात’ चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट दिले गेले. आज तर कपडेच नसतात, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी सध्याच्या चित्रपटांसह खालावत चाललेल्या दर्जावर खरमरीत टीका केली.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ (सिंहावलोकन) या विशेष विभागातील ‘शोमॅन’ दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपट सादरीकरणाला ‘बॉबी’ चित्रपटाने शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सुरुवात झाली. त्यापूर्वी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अभिनेते राजीव कपूर, महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल व संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते. मगदूम यांनी जुन्या चित्रपटाचा खास फोटो कपूर यांना भेट दिला. जुनं ते सोनं आहे, आपण आजही जुनी गाणी ऐकतो आणि सिनेमे पाहतो. आजचे सिनेमे लक्षात राहत नाहीत, कारण लोकही तसे आहेत. कलेची तुलना करताच येणार नाही. आज वाक्यांवर सिनेमा काढला जातो. गाडी पंक्चर होते आणि सिनेमा निघतो. सलमान आणि करिष्मा यांच्या ड्रेसला लोक टाळ्या वाजवतात, ही दुर्दैवी गोष्ट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘राज कपूर यांचे सर्वच सिनेमे उत्तम आहेत. मला बॉबी मास्टर स्ट्रोक वाटतो. तो मी जेव्हा पाहतो तेव्हा १७ वर्षांचा झाल्यासारखे वाटते,’ अशी भावनाही रणधीर कपूर यांनी व्यक्त केली.