‘संत तुकाराम’ पाहायला लोक बैलगाडी घेऊन ‘प्रभात’ ला येत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 08:16 AM2023-04-27T08:16:30+5:302023-04-27T08:18:40+5:30

प्रभात कंपनी कोल्हापूर सोडून १९३४ ला पुण्यात आली. त्यानंतर लगेचच साधारण १९३६मध्ये त्यांनी हे थिएटर भाडेतत्त्वावर घेतलं....

People come to 'Prabhat' with bullock carts to see 'Sant Tukaram' | ‘संत तुकाराम’ पाहायला लोक बैलगाडी घेऊन ‘प्रभात’ ला येत

‘संत तुकाराम’ पाहायला लोक बैलगाडी घेऊन ‘प्रभात’ ला येत

googlenewsNext

- राजू इनामदार

‘प्रभात’ या नावाला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळंच सुवर्णवलय आहे. दिग्गज गायकाचं नाव घेतलं की, अन्य गायक कसे कानाच्या पाळीला हात लावतात, अगदी तसंच! स्वत:चं चित्रपटगृह असलेली ही पुण्यातील एकमेव फिल्म कंपनी होती. ‘प्रभात’ हे त्या थिएटरचं नाव. कंपनीचा, मालकांपासून ते चित्रपट निर्मितीपर्यंतचा सगळा तोंडवळा कौटुंबिक जिव्हाळ्याचा, आपुलकीचा असा होता. ते सगळं जसंच्या तसं प्रभात चित्रपटगृहातही उतरलं होतं. कंपनीनं घेण्याआधी या चित्रपटगृहाचं नाव होतं किबे लक्ष्मी थिएटर. किबे या मालकांनी ते नाट्य व चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सन १९३४मध्ये बांधलं होतं.

प्रभात कंपनी कोल्हापूर सोडून १९३४ ला पुण्यात आली. त्यानंतर लगेचच साधारण १९३६मध्ये त्यांनी हे थिएटर भाडेतत्त्वावर घेतलं. तिथं कंपनीचे चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. कंपनीचा ‘संत तुकाराम’ इथेच प्रदर्शित झाला. तो तब्बल वर्षभर इथेच ठाण मांडून होता. त्यावेळी आसपासच्या गावांमधील लोक बैलगाडी करून चित्रपट पाहायला येत असत. काही जण सलग २ खेळ पाहत. त्यांची व्यवस्थापनाच्या वतीने बडदास्त ठेवली जात असे. तेव्हापासूनच की काय पण प्रभात थिएटर हे कुटुंबातील सदस्यांसमवेत चित्रपट पाहायचं थिएटर होऊन गेलं.

शहराचा मध्य भाग. आसपास सगळ्या खास ‘पुणेरी सदाशिवी’ पेठा. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच ‘प्रभात’ अस्ताला गेली. थिएटर दामले या ‘प्रभात’च्या एका मालकांकडे चालवण्यासाठी आलं. त्यांनी एकूण वातावरण लक्षात घेऊन इथे फक्त मराठी चित्रपट लावण्याचं ठरवलं. त्याचा परिणाम म्हणून प्रभात आणखीनच कौटुंबिक झालं. त्याच्या आजूबाजूला ‘रतन’, ‘वसंत’, ‘आर्यन’ वगैरेंसारखी ‘रसिली’ चित्रपटगृह असतानाही, ‘प्रभात’ची ‘घडी’ कधी विस्कटली नाही. ३४ मराठी चित्रपटांनी रौप्यमहोत्सव इथंच साजरा केला. ९ हिंदी चित्रपटही नंतर त्याच रांगेत आले.

अगदीच वर्दळीच्या रस्त्याला लागूनच ‘प्रभात’ आहे. सुरुवातीलाच ‘प्रभात’च्या त्या जगप्रसिद्ध तुतारी वाजवणाऱ्या ललनेचे फॅब्रिकेशनमध्ये केलेले चित्र. आत प्रवेश केला, की एखाद्या जुन्या वाड्यात आल्याचा भास व्हायचा. वर बाल्कनीत नेणाऱ्या पायऱ्याही तशाच! बाल्कनीच्या बाहेरची लॉबी वाड्याच्या व्हरांड्याची आठवण व्हावी अशी! तिकीट खिडकीपासूनच ‘प्रभात’चा ‘जिव्हाळा’ सुरू व्हायचा. उन्हातली रांग तिथले कर्मचारी स्वतः होऊन सावलीत न्यायचे. कँटीनही एकदम छान होतं.

अशा या घरगुती चित्रपटगृहातच ‘माहेरची साडी’चा खेळ वर्षभर सुरू होता. ‘हळदी-कुंकू’, ‘साडी वाटप’ असे एक ना शंभर प्रकार झाले त्यावेळी. ‘तोहफा’चे श्रीदेवी-जितेंद्रचे एकमेकांवर ‘रेललेले’ पोस्टर प्रभातवर लागले आणि पुण्यात अनेकांचा माथा ठणकला. मोर्चा आणि कायकाय झाले त्यावेळी! हिंदी चित्रपटही प्रदर्शित करण्याच्या व्यवस्थापनाचा निर्णय असा गाजला. नंतर मग नियमितपणे हिंदी खेळही सुरू झाले, पण म्हणून ‘प्रभात’चा तोंडावळा बदलला नाही.

काही वर्षांपूर्वी थिएटरबाबतचा करार संपला. दामलेंकडून ते किबेंकडं म्हणजे मूळ मालकांकडं आलं. त्यांनी ते चांगलं चालवण्याचा प्रयत्न केला, पण कोरोना आणि नंतर स्पर्धेच्या युगात ‘प्रभात’ थांबली ती थांबलीच. भिकारदास मारुतीजवळचा पुरातन वृक्ष पडला म्हणून त्यासाठी जाहीर श्रद्धांजली सभा घेणाऱ्या पुण्यात प्रभातचा हा सांस्कृतिक ठेवा नष्ट होतोय, याची मात्र कोणालाच खंत वाटलेली दिसत नाही. कालाय तस्मै नम:! दुसरे काय!

Web Title: People come to 'Prabhat' with bullock carts to see 'Sant Tukaram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.