आधारसाठी पहाटे उठून लावाव्या लागतात रांगा ; प्रशासनाचे दूर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 08:52 PM2019-05-07T20:52:22+5:302019-05-07T20:55:22+5:30

नवीन आधारकार्ड मिळविण्यासाठी किंवा आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना पहाटे 4 वाजल्यापासूनच रांगा लावाव्या लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

people facing problem to get aadhar card | आधारसाठी पहाटे उठून लावाव्या लागतात रांगा ; प्रशासनाचे दूर्लक्ष

आधारसाठी पहाटे उठून लावाव्या लागतात रांगा ; प्रशासनाचे दूर्लक्ष

Next

पुणे : महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांसह बँका आणि पोस्ट ऑफिसरमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे आधार केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र,बहुतेक सर्वच केंद्रांमध्ये नागरिकांना टोकन घ्यावे लागते तर काही ठिकाणी नाव नोंदणी करावी लागते. परिणामी आधार क्रमांक मिळवण्यासाठी आणि दुरूस्तीसाठी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.पहाटे लवकर उठून नऊ ते दहा वाजेपर्यंत रांगेत उभे राहिल्यानंतरच आधारचे काम होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या कामात सुसुत्रता आणावी, अशी मागणी केली जात आहे. 

शाळा महाविद्यालयांमधील प्रवेश, शासकीय कार्यालयातील नोंदणी आणि शासकीय योजनांचा लाभ आदी बाबींसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे आधारकार्ड मिळवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांसह, बँका आणि पोस्ट ऑफिसरमध्ये नागरिकांकडून गर्दी केली जाते. त्यातच येत्या जून महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत. सर्वच शाळांकडून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी आधारकार्डाची मागणी केली जाते. त्यामुळे सध्या पालक आधारकार्ड मिळविण्यासाठी आधार केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात नोकरीच्या निमित्ताने आलेल्या तरूणांकडून आधार कार्डावरील पत्ता बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पुणे शहरासह जिल्ह्यात तब्बल 280 ठिकाणी अधार केंद्रांच्या माध्यमातून आधार सेवा दिली जात आहे. मात्र, काही बँक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेमध्ये आधार नोंदणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी नागरिकांना टोकन घेण्याचे बंधन घातले जात आहे.त्यातही आधार केंद्रावर लवकर येणाऱ्या केवळ 8 ते 10 व्यक्तींनाच टोकन दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना आधारसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. तसेच सर्व्हवर डाऊन असल्याने आधारचे काम बंद असल्याची माहिती सांगून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

पुण्यातील एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक नागरिकांनी आधार नोंदणी व दुरूस्तीची कामे केली असल्याची माहिती ‘आधार’च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक नागरिकांऐवजी इतर ठिकाणांहून पुण्यात वास्तवास आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे आधार मिळण्यास अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. 
 

दुरूस्तीच्या कामासाठीच शुल्क 
आधार केंद्रांतील कर्मचा-यांनी नवीन आधार नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असे स्पष्ट आदेश आहेत.मात्र, आधार कार्डातील पत्ता किंवा इतर दुरूस्तीसाठी 50 शुल्क आकारण्यास हरकत नाही. परंतु, काही केंद्रीत कर्मचाऱ्यांकडून नवीन आधार सुरूस्तीसाठी सुध्दा नागरिकांकडून 50 रुपये शुल्काची मागणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासनाने आधार केंद्रातील कामात अधिक सुसुत्रता आणावी

लोहगाव येथील पोस्ट कार्यालयात आधार कार्ड दुरूस्ती व नोंदणीसाठी पहाटे चार ते पाच वाजता उभे राहावे लागते. त्यानंतर सकाळी 9 वाजता लवकर येणाऱ्या केवळ 8 व्यक्तींना टोकन दिले जाते. मला माझ्या पत्नीच्या आधारकार्डामध्ये दुरूती करवयाची आहे. मात्र, पोस्ट कार्यालयात केवळ लोहगावचेच नाही तर परिसरातील नागरिकही सकाळी येवून रांगा लावतात. मर्यादीत व्यक्तींच्याच आधार दुरूस्तीवर काम केले जात असल्याने या भागातील नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधार केंद्रातील कामात अधिक सुसुत्रता आणावी. 
- सचिन टिंगरे, नागरिक,लोहगाव

एक महिन्यानंतर मिळाले आधारकार्ड 
माझ्या मुलाच्या शाळेतील प्रवेशासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने महिनाभरापासून मी क्षेत्रीय कार्यालय,विविध बँकांच्या शाखा, पोस्ट ऑफिसमध्ये हेलपाटे मारले. तरीही मला आधार कार्ड मिळत नव्हते. अखेर दोन दिवसापूर्वी एका बँकेत सकाळी लवकर नाव नोंदवून टोकन घेतले. त्यानंतर मला सायंकाळी 5 वाजता आधार कार्ड मिळाले
- अशपाक पिंजार,पालक,

 

Web Title: people facing problem to get aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.