Pune Crime: झारखंडहून आले गणेशोत्सवात एकत्र जमले, अन् चोरीला लागले, चौघांना अटक
By नितीश गोवंडे | Published: September 27, 2023 04:52 PM2023-09-27T16:52:27+5:302023-09-27T16:54:02+5:30
गणेशोत्सवात चोऱ्या करणाऱ्या चौघांना अटक...
पुणे : शहरात गणेशोत्सवादरम्यान मोठी गर्दी होत असते, याचाच फायदा घेत परराज्यातील टोळ्या शहरात येऊन चोऱ्या करत असतात. अशाच झारखंड येथील चोरांच्या टोळीला पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या चोरांकडून १६ लाखांचे ५२ मोबाइल जप्त केले आहेत. शामकुमार संजय राम (२५), विशालकुमार गंगा महातो (२१), बालदकुमार मोतीलाल माहतो (२५) आणि विकीकुमार गंगा माहतो उर्फ बादशाह नोनीया (१९, सर्व रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे साथीदार गोपी माहतो आणि राहुल महातो हे चोरटे येरवडा परिसरातून फरार झाले आहेत.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस अंमलदार अजित मदने आणि कुंडलिक केसकर यांना मोबाइल चोरी करणारे संशयित उन्नती नगर कॅनॉल येथे थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान मोबाइल चोरीसाठी झारखंड येथे कट रचून पुण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले. अंगझडतीत त्यांच्याकडे चोरीचे मोबाइल देखील आढळून आले. मंडई परिसर, चित्रा चौक भाजी मंडई येथून त्यांनी मोबाइल चोरल्याची कबुली दिली. या आरोपींपैकी विकीकुमार गंगा माहतो उर्फ बादशाह नोनीया याच्यावर तीनपहाड, जि. पहाडगंज येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो या प्रकरणात फरार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.तर विशालकुमार गंगा महातो याच्यावर तीन पहाड येथील पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरण्यासाठी हे आरोपी १२ सप्टेंबर रोजी तीन पहाड रेल्वे स्थानकावर एकत्र भेटले. यानंतर हाटिया एक्सप्रेसने १४ सप्टेंबर रोजी ते पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर, येरवडा, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट आणि इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरले. तपास पथकाने आरोपींकडून ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून १६ लाखांचे ५२ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
यांनी ही कारवाई ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलिस निरीक्षक विश्वास डगले, संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, अनिरुद्ध सोनावणे प्रशांत टोणपे, अजित मदने, मनोज सुरवसे यांच्या पथकाने केली.