छत्रपतींच्या घराण्यातील लोकांकडूनच इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची पाठराखण; सपकाळांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:15 IST2025-04-11T16:14:28+5:302025-04-11T16:15:23+5:30
मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केली, याला इतिहास साक्षीदार आहे, उदयनराजे यांचे वक्तव्य दुदैवी व खोडसाळपणाचे आहे

छत्रपतींच्या घराण्यातील लोकांकडूनच इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची पाठराखण; सपकाळांची टीका
पुणे : मागील काही दिवसांपासून छत्रपतींच्या घराण्यातील खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे हे ज्यांनी इतिहासाला काळीमा फासण्याचे काम केले, त्यांची पाठराखण करत आहे. पहिल्या शाळेसंदर्भात खा. उदयनराजेंनी केलेले वक्तव्य दुदैवी आणि खोडसाळपणाचे आहे. सरकार या माध्यमातून इतिहास पुसण्याचे काम करत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतिनिमित्त सपकाळ यांनी समता भूमी येथे जावून फुले दाम्पत्याच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर कॉंग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, अॅ. अभय छाजेड आदी उपस्थित होते.
खा. उदयनराजे यांनी समता भूमी येथी माध्यमांशी बोलताना ‘‘थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, त्याचे महात्मा फुले यांच्याकडून अनुकरण करण्यात आले’’, असे वक्तव्य केले. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ म्हणाले, मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केली, याला इतिहास साक्षीदार आहे. उदयनराजे यांचे वक्तव्य दुदैवी व खोडसाळपणाचे आहे. छत्रपतींच्या घराण्यातील लोक इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची पाठराखण करत आहेत. ते सोलापूरकर व कोरटकरांवर कोहीच बोलत नाहीत, हेही दुदैवी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि त्यांचा इतिहास लोकांपर्यांत पोहचण्यात महात्मा फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी भारतात भारताच्या समतावादी विचार रुजविले. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केल्यानंतर त्यांच्यावर शेन फोकणारे, त्यांना त्रास देणारे परदेशातून आलेले नव्हते, ते लोक येथीलच होते. फुले चित्रपटातून ही दृष्य वगळण्यास सांगितले जात आहे. या माध्यमातून सरकार इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, हे पूर्वी होत होते, आता होत नाही. आता संविधान आहे, म्हणून त्या गोष्टी होत नाहीत चंद्रकांत पाटील यांच्या मताशी त्यांचा भाजप पक्ष सहमत आहे का, असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला.