'लाेकांकडे घर असते, माझ्याकडे इतिहास अाहे अाणि ताे जपायला हवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 09:40 PM2018-07-14T21:40:51+5:302018-07-14T21:53:50+5:30
पुण्यातील पेशवेकालीन मुजुमदार वाड्याला शेजारील अनधिकृत बांधकामामुळे धाेका निर्माण झाला अाहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यावे अशी अपेक्षा मुजुमदार व्यक्त करत अाहेत.
पुणे : इतिहास जपायला हवा, एेतिहासिक वास्तू टिकायला हव्यात, पुढच्या पिढीपर्यंत अापण अापली संस्कृती, कला पाेहचवायला हवी, अशा अाेळी अापण भाषणांमध्ये नेहमीच एेकत असताे. या स्मार्टफाेनच्या जगात अापणच इतिहासजमा हाेताेय की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी अाजची परिस्थीती अाहे. त्यातही इतिहासात पुण्याला महत्त्व अधिक. याच पुण्यातला पेशवेकालीन मुजुमदार वाडा एका अनधिकृत बांधकामामुळे धाेक्यात अाला असताना पुणे महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे भाषणांमध्ये जी अाश्वासनं दिली जातात ती कधी सत्यात उतरतील का असा प्रश्न अाता सामान्य नागरिकांना पडत अाहे.
पुण्यातील कसबा पेठेत पेशवेकालीन सरदार मुजुमदार वाडा अाहे. सध्या मुजुमदारांचे 10 वे वंशज या वाड्यामध्ये राहण्यास अाहेत. अापला इतिहास येणाऱ्या पिढीला कळावा, त्यांना अभ्यासता यावा यासाठी मुजुमदारांनी हा वाडा अाहे तसे ठेवण्याचा प्रयत्न केला अाहे. पुणे महानगरपालिकेने या वाड्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला हेरिटेजचा दर्जा दिला खरा, परंतु दरवाज्यावर एक पाटी व्यतिरिक्त कुठलिही मदत हा वाडा जतन करण्यासाठी पालिकेने मुजुमदारांना दिली नाही. हा वाडा खासगी मालमत्ता असल्याने पालिकेने अार्थिक मदत करावी अशी अपेक्षा मुजुमदार कुटुंबियांची नाही परंतु या वाड्याला कुठलिही हानी पाेहचणार नाही याची तरी खबरदारी महापालिकेने घ्यावी अशी अपेक्षा ते व्यक्त करत अाहेत. हा भाग शनिवार वाड्यापासून अवघ्या हकेच्या अंतरावर असल्याने बांधकामांवर अनेक मर्यादा येतात. त्यातच पालिकेने मुजुमदार वाड्याच्या शेजारील बांधकामाला केवळ दुरुस्तीची परवानगी दिलेली असताना तेथे पक्के बांधकाम करण्यात येत अाहे. हे बांधकाम मुजुमदार वाड्याच्या भिंतीला अगदी खेटून असल्याने भिंतीला धाेका निर्माण झाला अाहे. ज्या भिंतीला धाेका निर्माण झाला अाहे तेथे 1714 पासून गणपती बसविण्यात येत अाहे. या वाड्यातील गणेशाेत्सवालाही माेठी परंपरा अाहे. त्यामुळे अाता ही भिंतच पडण्याच्या मार्गावर असल्याने अाम्ही यंदा ही परंपरा बंद करायची का असा प्रश्न मुजुमदार अाता विचारत अाहेत.
याविषयी बाेलताना अनुपमा मुजुमदार म्हणाल्या. लाेकांकडे घर असते, माझ्याकडे इतिहास अाहे अाणि ताे जपायला हवा. या वाड्यात पेशवेकालीन अनेक वस्तू अाहेत. त्याचबराेबर हा वाडा तेव्हा जसा हाेता तसाच अाम्ही ठेवला अाहे. परंतु शेजारी चाललेल्या अनधिकृत बांधकामामुळे अाता या वाड्याला धाेका निर्माण झाला अाहे. इतक्या वर्षांपासून अाम्ही जपलेला इतिहास नष्ट हाेण्याच्या मार्गावर अाहे. महापालिकेला याबाबत कळवले असले तरी त्यांच्याकडून कुठलिही कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, अाम्ही मुजुमदारांना मदत करत अाहाेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या वाड्याची पाहणी केली अाहे. त्याचबराेबर जे नुकसान हाेत अाहे ते दुरुस्त करुन देण्यात येत अाहे. मुजुमदार व त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये काही वाद अाहेत, अाम्ही ते सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न करत अाहाेत.