लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय; खापर पणतू स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 09:13 PM2022-05-02T21:13:17+5:302022-05-02T21:51:49+5:30
समाधीसाठी लोकमान्यांनी काय केलं ते सर्वांना माहित्येय; टीकाकारांना कुणाल टिळकांचं उत्तर
पुणे: लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.
औरंगाबादच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असे वक्तव्य केले. त्यावर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत लोकमान्य टिळकांचा काहीही संबध नाही, तसेच त्यासाठी निधी जमा करून टिळकांनी त्याचा वापरच केला नाही अशी टीका समाजमाध्यमांमधून होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यावर टिळकविरोधी भाष्य केले.
कुणाल टिळक लोकमान्य टिळकांचे खापण पणतू आहेत. आमदार मुक्ता टिळक यांचे ते पुत्र असून भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष आहेत. ते म्हणाले, भाजपाचा म्हणून नाही तर टिळक कुटुंबाचा एक घटक म्हणून मी याचा प्रतिवाद करतो. टीका करणाऱ्यांनी आधी इतिहासाचे वाचन करणाऱ्याला प्राधान्य द्यावे. लोकमान्य टिळकांनीच समाधीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी निधी जमा केला. काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनीच सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना छत्रपती शिवाजी महाराज हे कसे स्वातंत्ऱ्यांची प्रेरणा आहेत याबद्दल सांगितले. शिवजयंतीला सार्वजनिक स्वरूप दिले ते लोकमान्यांनीच. या सर्वच गोष्टींना पुरावे आहे व टीका करणाऱ्यांनी त्याचा अभ्यास करावा व मगच बोलावे.
लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाच्या पावतीची गरज नाही, मराठी माणसांच्या मनात टिळकांना कायमच आदराचे स्थान आहे, ते तसेच राहिल, कोणाच्या टिकेने त्याला काहीही धक्का लागणार नाही असे कुणाल म्हणाले.