कोंढरीतील लोकांचे प्रशासनाने केले सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:09 AM2021-07-28T04:09:48+5:302021-07-28T04:09:48+5:30
भोर : भोर तालुक्यातील भूस्खलन झालेल्या कोंढरी गावातील लोकांना कोणताही धोका होऊ नये म्हणून भोर प्रशासनाने शाळा अंगणवाडी व ...
भोर :
भोर तालुक्यातील भूस्खलन झालेल्या कोंढरी गावातील लोकांना कोणताही धोका होऊ नये म्हणून भोर प्रशासनाने शाळा अंगणवाडी व नातेवाईकांकडे सुरक्षित ठिकाणी हालवले आहे. मात्र तात्पुरते निवारा शेड किंवा चांगल्या ठिकाणी पुनर्वसन केले जात नाही फक्त पावसाळा आला की दरवर्षी प्रशासनाला कोंढरी गावाची आठवण होते. एकतर आमचे पुनर्वसन करा, अन्यथा आम्हाला पावसात मुलाबाळांना घेऊन इकडेतिकडे फिरण्यापेक्षा गावातच मरू द्या, अशा संतप्त प्रतिक्रिया कोंढरी गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
२०१९ साली भोर महाड रस्त्यावरील कोंढरी गावाच्या वरती असलेल्या डोंगरात पावसाचे पाणी जाऊन भूस्खलन होऊन घरांजवळ आले होते. त्यामुळे गावातील लोकांना गावातीलच प्राथमिक शाळा अंगणवाडीत तर काही जण आपआपल्या नातेवाईकांकडे सुरक्षित ठिकाणी राहिले होते. पावसाळा संपल्यावर पुन्हा गावकरी गावात राहायला जातात. मागील दोन वर्षांत पुनर्वसनाचा प्रस्ताव प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता.त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.मात्र ना निवारा शेड मिळाली ना पुनर्वसन झाले. दोन वर्षांपासून जैसे थे परिस्थिती असाल्याचे कोंढरी गावातील नागरिक प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत आहेत.
सध्या तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून कोंढरी गावाला धोका होऊ नये म्हणून मागील चार दिवसांपासून प्रशासनाने कोंढरी गावातील ४० कुटुंबांतील १६३ लोकांना प्राथमिक शाळेत सुरक्षित ठिकाणी आणले आहे. यातील काही जण आपल्या नातेवाईकांकडे राहात आहेत. प्रशासनाने गावातील लोकांची जेवणाची सुविधा करुन दिली आहेत. मात्र दरवेळी पावसाळ्यात गावाबाहेर राहायला जायचे आणि पावसाळा संपला की पुन्हा गावात जायचे हे ठरलेले आहे. शासन यावर काहीच तोडगा काढत नाही.
दरम्यान, कोंढरी गावातील भूस्खलन झालेल्या डोंगराची पाहणी जिल्हाधिकाऱ्यासह सर्व अधिकाऱ्यांनी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. कोंढरी गाव नीरा देवघर धरणात बुडीत क्षेत्रात गेले होते. त्या वेळी पुनर्वसन झालेले होते. नवीन पुनर्वसन होत नाही. मात्र नव्याने कोंढरी गावाचे पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करा, पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार देशमुख यांनी दिले होते.
- दरवर्षी पावसाळ्यात लोकांची प्रशासनाला आठवण
सन २०१९ साली कोंढरी गावातील डोंगरात भूस्खलन होऊन डोंगरच खाली आला होता. त्या वेळी गाव धोकादायक झाल्याने गावातील लोकांचे जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले होते. त्यावेळी पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे, खासदार, आमदार सर्वानी भेटी देऊन पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षांत ना तात्पुरती निवारा शेड ना पुनर्वसन ना सुरक्षित ठिकाणी हालवले होते. या वेळी सर्वत्र भूस्खलन होऊन डोंगर खाली येत असल्याने येथील लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत. माञ दरवेळी पावसाळा आला की प्रशासनाला येथील लोकांची आठवण होते.पावसाळा संपला की सर्वजण विसरुन जातात. लोकांना वाऱ्यावर सोडले जाते, अशा संतप्त प्रतिक्रिया येथील येथील भिवबा पारठे व नागरिक यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, म्हसर बुदुकची डोईफोडेवास्ती येथील तीन कुटुंबांतील १८ लोकांनाही प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी आणून सोयीसुविधा पुरवल्या आहेत. तर हिर्डोशी गावातील मालुसरेवस्ती येथील १४ कुटुंबांतील ४५ लोकांनाही धोका होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी आणले, तर अनेकजन नातेवाईकांकडे राहात आहेत.
कोंढरी गावातील नागरिक शाळेत एकत्र जेवण करताना.