तमाशा संवर्धनासाठी लोकांच्या पाठबळाची गरज
By admin | Published: November 7, 2016 01:21 AM2016-11-07T01:21:51+5:302016-11-07T01:21:51+5:30
तमाशा ही कला अनेक संकटांशी सामना करीत आहे, या लोककलेच्या संवर्धन व विकासासाठी पाठबळाची गरज आहे. तमाशा हे केवळ मनोरंजन नसून जातिवंत कला आहे
कळस : तमाशा ही कला अनेक संकटांशी सामना करीत आहे, या लोककलेच्या संवर्धन व विकासासाठी पाठबळाची गरज आहे. तमाशा हे केवळ मनोरंजन नसून जातिवंत कला आहे, असे मत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.
आपल्या यशामागची प्रेरणा सांगताना त्या आपल्या आईचा, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा आवर्जून उल्लेख करतात.
नारायण खुडे, भाऊ बापू नारायणगावकर तमाशा मंडळ, आई विठाबाई भाऊ नारायणगावकर व माझी चौथी तर नितीनची पाचवी पिढी तमाशा क्षेत्रात आहे. यामध्ये मोठे बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी गॅस बत्तीवर आम्ही कार्यक्रम केले होते. आज इलेक्ट्रॉनिक झाले आहे. गोवा येथे तमाशा महोत्सवात माझ्या मंडळाची निवड झाली. त्या वेळी प्रवासाला जात असतानाच कोणीतरी कार्यक्रमास जाऊ नये म्हणून खोडसाळपणे निधनाची बातमी पसरवली. मात्र अशा गोष्टीकडे कधीही लक्ष दिले नाही.
पती रामचंद्र बनसोडे यांनी भूमिका केलेले वगनाट्य सत्य घटनेवर आधारित असायचे. विष्णू बाळा पाटील, बापू बिरू वाटेगावकर, कारगिलच्या युद्धज्वाला, राजीव गांधी हत्याकांड, जन्मठेप कुंकवाची, चंदनतस्कर वीरप्पन, यामुळे आम्ही वेगळी ओळख निर्माण केली. उडत्या चालींच्या गाण्यांसह बैठकीच्या गाण्याला तसेच नवीन चित्रपटांच्या गाण्याला जास्त मागणी असते. महाराष्ट्रातील जत्रा, यात्रा, उरूस यासाठी सप्टेंबर ते मे असे ८ महिने कार्यक्रम चालू असतात.
बदलत्या रुचीनुसार श्रोत्यांना काय हवे ते देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. माझे शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले आहे. राज्य शासनाने मला अण्णा भाऊ साठे पुरस्कार, जीवनगौरव, असे पुरस्कार दिले आहेत. कार्यक्रम करून परतत असताना बसने पेट घेऊन झालेला अपघात हा आयुष्यातील सर्वात मोठा दु:खाचा क्षण होता. मात्र राज्य शासनाने मदत केली त्यामुळे आम्ही उभे राहिलो.(वार्ताहर)