पुणेकरांनो, सावधान! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजविण्यावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 08:55 PM2020-11-09T20:55:53+5:302020-11-09T21:00:19+5:30
पुणे महापालिका आयुक्तांनी काढला आदेश
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची मागणी पुढे आल्यानंतर पुणे महापालिकेने सार्वजनिक ठिकाणांवर फटाके वाजविण्यावर बंदी घातली आहे. यासोबतच खासगी परिसरात फटाक्यांचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी काढले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला आहे. फटाके वाजविण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे. तसेच, फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनमार्ग आणि घशाचे विकार उद्भवून कोरोनाला निमंत्रण मिळू शकते अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी कमी धुराचे आणि आवाज होणार नाही अशा फटाक्यांचा वापर करावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
=====
1. पालिकेच्या मालकीच्या उद्याने, मैदाने, पर्यटन स्थळे, शाळा आदी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. तसेच सर्व खाजगी परिसरात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा किंवा शक्यतो टाळावा.
२. कोविड - १९ बाधित रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी कमी आवाजाचे (ध्वनी प्रदूषण न होणारे) तसेच कमी धूर होणा-या फटाक्यांचा वापर करावा.
3. नागरिकांनी कोविड विषयक योग्य ती खबरदारी घ्यायची आहे. यामध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींग, साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावी.
4. कोरोना झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे.
5. सॅनिटायजर ज्वलनशील असल्याने दिवाळीचे दिवे लावताना तसेच फटाके फोडताना सॅनिटायजरचा वापर टाळावा. सॅनिटायजर ऐवजी साबण किंवा हॅन्ड वॉशचा नियमितपणे वापर करावा.
6. दिवाळी काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक / सांस्कृतिक / सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण (दिवाळी पहाट) कार्यक्रमांना परवानगी नाही. ऑनलाईन कार्यक्रमांना परवानगी आहे.
7. दिवाळीकरिता खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी व कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे व योग्यती खबरदारी घ्यावी.
====
कोविड विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी, नियमांबाबत सहाय्यक आयुक्त ांनी जनजागृती करण्यासोबतच नियम भंग करणा-यांवर मास्क योग्य प्रकारे परिधान न करणे, रस्त्यावर धुंकणे, विना परवानगी कार्यक्रम आयोजित करणे, गर्दी करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.