पुणेकरांनो,घराबाहेर पाऊल टाकताय खरं पण नवीन नियमावली माहितीय? वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 09:29 PM2020-09-17T21:29:41+5:302020-09-17T21:53:05+5:30
नियमावलीचे पालन केले नाही तर होऊ शकते कारवाई..
पुणे : कोरोनाबाधितांची शहरात नित्याने होणारी वाढ व दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने कठोर पाउले उचलली असून, मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही शनिवारपासून जमावबंदीचे आदेश काढण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहे. यामुळे दोनपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्यास त्यांच्यावर कलम १४४ अंतर्गत थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची वाढ गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज दीड ते दोन हजारांवर आहे. हा संसर्ग वाढीचा आलेख काही केल्या खाली येत नसल्याने, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांवर, दुकानांबाहेर तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी हे जमावबंदीचे आदेश जारी करण्यात येणार आहेत.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी, शहरात शनिवारपासून दोन पेक्षा जास्त नागरिक विनाकारण एकत्र दिसल्यास कारवाई करण्याबाबतचे सुतोवात पत्रकारांशी बोलताना दिले. मुंबईप्रमाणेच हे आदेश जारी करण्यात येणार असून, अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त एकत्र येणाऱ्या आहे अथवा विनाकारण फिरणाºयांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.
याबाबत पोलिस विभागाशी बोलून कारवाईची रूपरेषा शुक्रवारी ठरविण्यात येणार असून, त्याबाबतचे महापालिका स्तरावरील आदेशही जारी करण्यात येणार आहे. शनिवारपासून शहरात जमावबंदी तसेच दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्याबाबत निर्बंध जाहिर करण्यात येणार आहेत. हे आदेश जारी करताना कोणत्या कारणांसाठी नागरिकांना सवलत दिली जाईल, कुठे हे आदेश लागू राहतील, त्याचे स्वरूप काय असेल याबाबतचे सविस्तर आदेश शुक्रवारी सायंकाळी काढण्यात येणार असल्याचेही विक्रम कुमार यांनी सांगितले.
------------------------