‘लोकमत’मुळे गाव पुन्हा आठवलं!
By Admin | Published: July 31, 2015 03:49 AM2015-07-31T03:49:31+5:302015-07-31T03:49:31+5:30
माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले.
माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी मदत देऊन माळीणचे पुनर्वसन वर्षात करून दाखवू, अशा घोषणा केल्या. परंतु सुरुवातीचे दोन महिनेच तो टिकला. आजचे माळीण म्हणजे तिथे फक्त भग्न अवशेष शिल्लक आहेत. गावकरी पत्र्याच्या शेडमध्ये कसेबसे जगत आहेत. त्या गावाच्या अस्तित्वाच्या खुणा फक्त दिसत राहतात. जगण्याचा संघर्ष मात्र अजूनही संपलेला नाही. पुनर्वसनाचा प्रश्न वर्षभरानंतर जागेवरच अडलेला आहे. अंशत: बाधीत कुटुंबीयांची यात मोठी परवड सुरू आहे. मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना अपघात विमा अद्याप मिळालाच नाही....आदी विषय गेल्या आठ दिवसांपासून ‘लोकमत’ने मांडले.
याबरोबरच आतापर्यंत माळीणसाठी झालेल्या चांगल्या कामांचे कौतुकही ‘लोकमत’ने केले. यात प्रशासनाने दिलेला २३ कोटींचा निधी असो की माळीण गावावर जी आपत्ती आली, त्यातून सावरण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. परंतु, त्यातील अनेक जण असे होते, जे अतिशय चांगले काम करूनही वर्षभर प्रसिद्धीच्या झोतात फारसे आले नाहीत. अशा लोकांनी पडद्यामागेच राहून आपले कर्तव्य पार पाडले. माणुसकीच्या भावनेतून प्रत्यक्ष मदतकार्यात उतरलेल्या व नंतरही मदतीचा हात देणाऱ्या लोकांची दखल घेतली.
आज माळीण दुर्घटनेस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दुर्घटनाग्रस्त माळीण गावात आयोजित केला होता. या ठिकाणी मृत लोकांचे कुटुंबीय, तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी, नातेवाईक जमले होते. त्यांनी ‘लोकमत’ने मांडलेल्या या सर्व विषयांचे कौतुक केले.
तसेच, अशंत: बाधित कुटुंबीयांनाही कायमस्वरूपी पुनर्वसनात त्यांना घरे दिली जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने रखडलेल्या विमा योजनेचे चेक तातडीने त्या विद्यार्थ्यांच्या वारसांना सुपूर्त केले. (वार्ताहर)