लोकांनी माझ्या कामातून मला अनुभवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:31+5:302021-01-25T04:10:31+5:30
पुणे : मी सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही. लोकांनी मला पाहावे असे मला वाटत नाही. माझ्या कामाद्वारे त्यांनी ...
पुणे : मी सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही. लोकांनी मला पाहावे असे मला वाटत नाही. माझ्या कामाद्वारे त्यांनी मला अनुभवावे अशी माझी इच्छा असते. मी काही जरी सोशल मीडियावर टाकले तरी लोक मला का फॉलो करतात तेच समजत नाही, अशी मिश्किल टिप्पणी प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याने केली.
सिंबायोसिस तर्फे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत तो बोलत होता. यावेळी सिंबायोसिस चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार आणि सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र- कुलपती डॉ विद्या येरवडेकर उपस्थित होत्या. सध्याच्या चित्रपटांचे विषय, मांडणी, त्याच्या चित्रपटांना मिळणारी लोकप्रियता अशा सर्व मुद्द्यांवर त्याने मोकळेपणाने संवाद साधला.
आमीर म्हणाला की, माझ्या विचारानुसार सर्जनशील बदल हा एक महत्त्वाचा बदल आहे. पूर्वी कलात्मक चित्रपटांमध्ये वेगळ्या धाटणीचे विषय हाताळले जायचे. पण आज मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये देखील हटके विषयांची मांडणी केली जात आहे आणि हा बदल प्रेक्षकांनीही स्वीकारला आहे.
आपल्या चित्रपटांना मिळणाऱ्या चीन आणि हॉंगकॉंग मधील लोकप्रियतेचे सर्व श्रेय त्याने प्रेक्षकांना जात असल्याचे त्याने सांगितले. ते त्यांच्या देशाबाहेरील संस्कृतीचे स्वागत करीत आहेत आणि यासाठी आपण त्यांचे कौतुक केले पाहिजे तसेच त्यांच्याकडून शिकले देखील पाहिजे. चित्रपटांना मिळणाऱ्या लोकप्रियतेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चित्रपट पायरसी आहे. पायरसीरीने मला चीनमध्ये लोकप्रिय बनवले असल्याचे तो म्हणाला.
सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया कम्युनिकेशनच्या संचालिका डॉ. रुची जग्गी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. रजनी गुप्ते, यांनी आभार मानले.
...
चित्रपटगृहामध्ये प्रत्यक्ष जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद हा वेगळाच असतो त्याची तुलना होऊच शकत नाही. हा एक सामूहिक अनुभव असतो. ही वेळ लवकरच परत येईल जेव्हा आपण सर्वजण चित्रपट पाहण्याचा हा अनोखा अनुभव घेऊ शकू असा विश्वासही आमीरने व्यक्त केला.
.....
आरोग्य सेवा प्रत्येकासाठी समान असली पाहिजे. एखाद्याच्या सांपत्तिक स्थितीनुसार त्याला / तिला कोणत्या प्रकारचा उपचार मिळेल हे ठरवले जाऊ नये. सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध असावी अशी अपेक्षा आमीर ने व्यक्त केली.
….