'जनतेला त्रास होयला नको...' पुण्यातील चांदणी चौकातल्या वाहतुक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश
By नितीश गोवंडे | Published: August 28, 2022 06:28 PM2022-08-28T18:28:16+5:302022-08-28T18:30:53+5:30
येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल
पुणे : चांदणी चौकातील वाहतुक कोंडीची समस्या मुख्यमंत्र्यांनी चांगलीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. रविवारी साताऱ्याहून मुंबईकडे मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबून नेमकी वाहतुक कोंडी कशामुळे होते याची कारणे समजून घेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर यातून नागरिकांची मुक्तता करा, शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको असे आदेश दिले. येत्या १५ सप्टेंबर नंतर नागरिकांची या वाहतुक कोंडीतून मुक्तता होईल ही आशा नव्याने पल्लवीत झाली आहे.
शुक्रवारी (२६ ऑगस्ट) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मुंबईहून साताऱ्याकडे जात असताना चांदणी चौकात नागरिकांनी अडवला होता. दररोज संध्याकाळी या चौकात होणारी वाहतुक कोंडी, त्यामुळे घरी जाण्यासाठी होणारा उशीर यामुळे वैतागलेल्या पुणेकरांनी हा मार्ग निवडला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे फोनद्वारे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली रविवारी (२८ ऑगस्ट) मुख्यमंत्री साताऱ्याहून मुंबईला जात असताना त्यांनी चांदणी चौकात थांबत वाहतुक कोंडीची कारणे लक्षात घेत, या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे आदेश त्यांनी दिले. तसेच वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रिंग रोडच्या नियोजनाविषयी देखील माहिती घेतली. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांची चांदणी चौकात उपस्थिती होती.
- १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांदणी चौकातून पुल पाडणार.
- पूल पाडल्यानंतर लगेचच मुंबई-बेंगलौर हायवेवरील दोन लेन वाढवणार.
- नव्या पुलाच्या बांधकामाला देखील लगेचच सुरूवात होणार.
- वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी सहा लेनची तरतूद.
- यामुळे मुंबई-बेंगलौर हायवेवरील भार कमी होऊन, नागरिकांची वाहतुक कोंडीतून मुक्तता होणार.