लोकं मला ‘इंजिनिअर शेळक्या’ म्हणून चिडवायचे! पॅरालाॅम्पिकमध्ये राैप्यपदक जिंकणाऱ्या सचिनची भावना

By श्रीकिशन काळे | Published: September 19, 2024 04:32 PM2024-09-19T16:32:08+5:302024-09-19T16:33:23+5:30

भारताला रौप्यपदक जिंकून दिल्यावर सरकारने मला क्लास वनची पोस्ट दिली, त्यामुळे माझे खेळाचे स्वप्न आणि वडिलांचे मी अधिकारी बनावे हे स्वप्न, दोन्ही पूर्ण झाले

People used to tease me as engineer goat Sachin Khilare feeling after winning silver medal in Paralympics | लोकं मला ‘इंजिनिअर शेळक्या’ म्हणून चिडवायचे! पॅरालाॅम्पिकमध्ये राैप्यपदक जिंकणाऱ्या सचिनची भावना

लोकं मला ‘इंजिनिअर शेळक्या’ म्हणून चिडवायचे! पॅरालाॅम्पिकमध्ये राैप्यपदक जिंकणाऱ्या सचिनची भावना

पुणे : मी बीई इंजिनिअरींग केले आणि घरची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून गावी गेलो. तिथे दुष्काळ असल्याने शेती जळून गेलेली. मग मी तिथे शेळीपालन करावे म्हणून शेळी पाळली होती. तेव्हा लोकं मला ‘इंजिनिअर शेळक्या’ असे म्हणून चिडवायचे ! पण मी निराश झालो नाही, मला क्रीडा क्षेत्रात करीअर करायचे होते, त्यात मेहनत घेतली आणि भारताला पॅरालॉम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवून दिले, अशा भावना पॅरालाॅम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारे यांनी व्यक्त केल्या.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गुरूवारी (दि.१९) पत्रकार संघात पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेता सचिन खिलारी याच्याशी वार्तालाप कार्यक्रमांतर्गत संवाद आयोजित केला होता. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव आदी उपस्थित होते. यशवंत सिंह यांनी सूत्रसंचालन केले.

सचिन म्हणाला, मी सुरवातीला अभ्यासात खूप कच्चा होतो. त्यामुळे वडिल निराश झाले होते. त्यांना वाटायचे मी क्लास वन अधिकारी व्हावे. पण माझे लक्ष खेळाकडे होते. मी गोळाफेकमध्ये लक्ष दिले आणि त्यात आपण पॅरालॉम्पिकमध्ये जाऊन खेळू शकतो, याचा आत्मविश्वास मिळाला. माझा डावा हात पूर्णपणे निकामी आहे. माझे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांनी मला खूप मार्गदर्शन केले. त्यानंतर खूप मेहनत घेतल्यानंतर माझी पॅरालॉम्पिकमध्ये निवड झाली. तिथे गेल्यावर मला खूप अभिमान वाटला की, भारतासाठी तिथे जाऊन रौप्यपदक मिळवले. खरंतर माझी मेहनत कमी पडली. पण या पदकाचा रंग पुढच्या पॅरालॉम्पिकमध्ये सोनेरी करणार,’’ असा निर्धार सचिनने व्यक्त केला.

वडिलांचे स्वप्न पुर्ण !

माझे वडिल शेतकरी होते. त्यांना कृषीभूषण पुरस्कारही मिळालेला. मी अधिकारी व्हावे अशी त्यांची इच्छा हाेती. पण मी खेळाकडे वळलो आणि त्यात भारताला रौप्यपदक जिंकून दिले. त्यामुळे सरकारने मला लगेच क्लास वनची पोस्ट दिली. माझे खेळाचे स्वप्न आणि वडिलांचे मी अधिकारी बनावे हे स्वप्न, असे दोन्ही पूर्ण झाले, अशी भावना सचिनने व्यक्त केली.

दिव्यांगांनी निराश न होता पॅरालॉम्पिकमध्ये जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी. त्यासाठी पॅरालॉम्पिक असोसिएशन मदत करते, सरकार मदत करते. केवळ मेहनत, कष्ट करण्याची तयारी हवी, तुम्ही पॅरालॉम्पिकमध्ये पदक जिंकू शकता, असे आवाहन सचिनने केले.

Web Title: People used to tease me as engineer goat Sachin Khilare feeling after winning silver medal in Paralympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.