Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे

By राजू इनामदार | Published: July 16, 2024 06:21 PM2024-07-16T18:21:52+5:302024-07-16T18:22:22+5:30

संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत पांघरलेला खोटेपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत

People will decide the number of BJP and mahayuti for the assembly election Chandrasekhar Bawankule | Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे

पुणे: महायुतीत भारतीय जनता पक्ष हाच मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाला अनेक भूमिका वठवाव्या लागतात. कार्यकर्त्यांचे काम सरकार आणायचे असते, त्यानंतर सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण हे नेत्यांनी ठरवायचे असते असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. लोकसभेसाठी ४०० पार चा नारा होता, आता विधानसभेसाठी किती हे सांगायचे मात्र बावनकुळे यांनी यावेळी टाळले.

भाजपच्या प्रदेश विस्तारीत कार्यकारिणीचे अधिवेशन २१ जुलैला पुण्यात होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी बावनकुळे पुण्यात आले होते. अधिवेशनाची माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना बावनकुळे यांनी लिलया उत्तरे दिले, मात्र विधानसभेसाठी भाजप किती व महायुती किती हा आकडा सांगण्याचे त्यांनी टाळले. लोकच काय ते ठरवतील असे ते म्हणाले. महायुतीतील सर्वच पक्षांना त्यांची राजकीय शक्ती वाढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते कार्यक्रम राबवतात, महायुती म्हणून आम्ही एकत्रच आहोत व सर्व पक्षाचे नेते एकत्र बसून जागांचा निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. पक्षाचे राज्य पदाधिकारी विजय चौधरी, माधव भंडारी तसेच राजेश पांडे, पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

भाजप राज्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान संवाद यात्रा काढणार आहे. सर्व म्हणजे २८८ विधानसभा मतदारसंघात पक्षाचे २० नेते जातील, कार्यक्रम घेतील. मतदारांबरोबर बोलतील असे त्यांनी सांगितले. लोकसभेत महाविकास आघाडीने खोटारडेपणा केला. संविधान बदलण्यात येणार यासारखा प्रचार केला. आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारने केलेली कामे सांगितले. त्यांचा खोटेपणा उघड करण्यात आम्ही कमी पडलो. मात्र आता तसे होणार नाही. केंद्र व राज्यात असे दोन्हीकडे एकच सरकार असले की कशी कामे होतात हे राज्यातील जनता पहात आहे. उद्धव ठाकरे सरकारने केंद्राच्या ८ योजना राज्यात बंद करून ठेवल्या. मागील दोन वर्षात आम्ही सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या, त्या राबवल्या, त्याचीच माहिती आम्ही जनतेत जाऊन देऊ असे बावनकुळे म्हणाले.

अधिवेशनाला पक्षाचे ५ हजारपेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच अन्य अनेक नेते अधिवेशनाला उपस्थित असतील. पक्षाची आगामी दिशा, धोरणे यावर पक्षात मंथन होईल. विधानसभेच्या निवडणुकांसाठी शाह मार्गदर्शन करतील असे बावनकुळे यांनी सांगितले. संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत पांघरलेला खोटेपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत असे ते म्हणाले.

Web Title: People will decide the number of BJP and mahayuti for the assembly election Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.