लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 12:21 PM2024-04-21T12:21:03+5:302024-04-21T12:21:18+5:30
भाजपमध्ये ३० टक्के लोकं इतर पक्षांकडून आल्याने पक्षांतर्गत संघर्ष सुरू झालाय
पुणे : ‘‘गेल्या दोन निवडणुकांमध्ये जी लाट होती, ती यंदा नाही. केंद्र सरकारच्या विरोधात लोकांमध्ये राग आहे. त्यामुळे या वेळची लोकसभा त्रिशंकू होईल आणि एकहाती सत्ता येणार नाही,’’ असा दावा ज्येष्ठ गांधीवादी नेते व युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला.
काॅंग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. सप्तर्षी म्हणाले की, देशात पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. त्याच्या आकडेवारीवरून तर केंद्र सरकारच्या विरोधातील लाट दिसत आहे. इस बार चारशे पार, अशी त्यांनी जाहिरात केली; पण त्यांना चारशे पार जागा हव्यात कशाला? बहुमतापेक्षा अधिक जागा त्यांना हव्यात, हे ऐकूनच धडकी भरते. आपला देश विविध संस्कृतींचा, जातींचा, धर्मांचा आहे. केवळ हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. खरंतर ‘आरएसएस’ला हिंदू राष्ट्र घडवायचे आहे आणि विशिष्ट विचारसरणीचा माणूस तयार करायचा आहे. जे या देशात शक्य नाही. नागरिकांनी ते होऊ देऊ नये. देशाचे संविधान, लोकशाही वाचविण्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’
डाॅ. सप्तर्षी म्हणाले...
- भाजपमध्ये ३० टक्के लोकं इतर पक्षांकडून आले आहेत. उमेदवार आयात केल्याने पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.
- खरंतर भाजपमध्ये कोणी मोठा होऊ लागला की, त्याला मोडीत काढले जाते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, शिवराजसिंह चौहान, आदींचा समावेश आहे.
- राजकारण म्हणजे व्यापार झाला असून, महाराष्ट्रात त्याचे व्यापारीकरण अधिक झाले आहे. ‘तुम्ही आमच्याकडे या, नाहीतर जेलमध्ये जा’ अशी धमकी देत लोकं आपल्याकडे घेत आहेत. भाजपमधील लोकांना मात्र गप्प बसावे लागत आहेत.
ज्याचा खासदार पुण्यात, त्याचे राज्य केंद्रात
पुण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक परंपरा आहे. पुण्यात ज्या पक्षाचा खासदार होतो, त्याच पक्षाचे सरकार केंद्रामध्ये येते. उदा. सुरेश कलमाडींपासून ते अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांच्यापर्यंतचा इतिहास पाहा. यंदा महाविकास आघाडीचा उमेदवार येण्याची शक्यता आहे, असे भाकीत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.